कडावल सरपंचपदी स्नेहा ठाकूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मार्च 2019

कुडाळ - कडावल सरपंचपदाच्या निवडणुकीत स्नेहा ठाकूर विजयी झाल्या. हा आमचा सरपंच असल्याचे स्वाभिमान तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी सांगत तालुका स्वाभिमान पक्षातर्फे त्यांचे अभिनंदन केले, तर नारुर कर्याद नारुरमध्ये एकच अर्ज सादर झाल्याने सौ. अलका पवार पुन्हा एकदा बिनविरोध सरपंचपदी निवडून आल्या आहेत.

कुडाळ - कडावल सरपंचपदाच्या निवडणुकीत स्नेहा ठाकूर विजयी झाल्या. हा आमचा सरपंच असल्याचे स्वाभिमान तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी सांगत तालुका स्वाभिमान पक्षातर्फे त्यांचे अभिनंदन केले, तर नारुर कर्याद नारुरमध्ये एकच अर्ज सादर झाल्याने सौ. अलका पवार पुन्हा एकदा बिनविरोध सरपंचपदी निवडून आल्या आहेत.

कडावल सरपंचपदासाठी काल (ता.२४) मतदान झाले. आज येथील तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. यावेळी स्नेहा सुनिल ठाकूर ३२७ मतांनी सरपंच पदासाठी निवडून आल्या. स्नेहा व बाळकृष्ण ठाकूर यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केले होते. एकूण झालेल्या ६६० मतांपैकी बाळकृष्ण यांना ३१६ तर स्नेहा ठाकूर ३२७ व नोटा १७ अशी मते पडली.

नारुर कर्याद नारुरमध्ये एकच अर्ज सादर झाल्याने सौ. अलका पवार पुन्हा एकदा बिनविरोध सरपंचपदी निवडून आल्या आहेत. कडावल ग्रामपंचायतीमधील यापूर्वीच्या सरपंचांनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना सरपंच पदावरून अपात्र ठरविण्यात आले होते. यानंतर या सरपंच पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन रविवारी मतदान प्रक्रिया झाली. कडावलमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या या सरपंच पदासाठी स्नेहा सुनील ठाकूर व बाळकृष्ण शंकर ठाकूर यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले होते. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. ९७२ मतदार असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये ६६० मतदारांनी मतदान केले होते.

एकूण तीन केंद्रांवर ही निवडणूक घेण्यात आली. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुडाळ नगरपंचायतीचे  कर्मचारी एस.एम.कोरगावकर यांनी काम पाहिले. आज सकाळी ११ वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. नारूर कर्याद नारूर व कडावल ग्रामपंचायतीच्या यापूर्वीच्या सरंपचांनी आपला जातीचे प्रमाणपत्र विहीत मुदतीत सादर न केल्याने या दोन्ही ग्रामपंचायती मधील सरपंच पद जिल्हा प्रशासनाकडून रद्दबातल ठरविण्यात आले होते. यातील नारूर क. नारूर ग्रामपंचायतीच्या यापूर्वीच्या सरपंच सौ. अलका रमेश पवार यांनी मुदत संपल्यानंतर आपले प्रमाणपत्र सादर केले होते; मात्र आता या सरपंच पदासाठी कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या सरपंच पदासाठी आपला अर्ज सादर केला आहे.

अनुसूचित जमाती स्त्री यासाठी आरक्षित असलेल्या या जागेसाठी अन्य कोणीच अर्ज सादर न केल्याने सौ. अलका पवार या एकमेव दावेदार असलेल्या उमेदवार या पदी बिनविरोध निवडून आल्या आहेत. नारूर क. नारूर सरपंच पदासाठी अलका पवार यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर कातकरी समाजाकडून जल्लोष करण्यात आला होता. कडावल सरपंचपदी स्नेहा सुनील ठाकूर यांनी नाव कोरले. ठाकूर यांच्या अभिनंदनप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, राकेश कांदे, रुपेश बिडये, सुनील बांदेकर, कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sneha Thakur elected as Kadlav Sarpanch