शिवसेना, स्वाभिमानने 'खंबाटा' प्रश्‍नावरील राजकारण बंद करावे

राजेश कळंबटे
मंगळवार, 9 एप्रिल 2019

खरेतर 70 टक्केहून अधिक खंबाटा कामगार हा कोकणी माणूस आहे. त्यांचे संसार उध्वस्त करून त्यांना देशोधडीला लावणारे हे चोर उलट्या बोंबा मारत आहेत. मला हे ऐकवत नव्हते म्हणूनच आज कोकणात येऊन सत्य मांडत आहे.

- अंजली दमानिया

रत्नागिरी - खंबाटा कामगारांच्या तोंडचा घास काढून खाणारे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि नितेश राणे या तिघांनाही खंबाटा कामगारांच्या प्रश्‍नावरुन राजकारण सुरु केले आहे. ते राजकारण बंद करा, असा इशारा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी दिला.

रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. दमानियांनी शिवसेना, स्वाभिमान या दोन्ही पक्षांना मतदान करु नका, असेही आवाहन केले. दमानिया म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर स्वतःला कोकणचे नेते म्हणविणारे शिवसेनेचे विनायक राऊत व स्वभिमान संघटनेचे नितेश राणे यांनी खंबाटा कामगार प्रश्नी आरोप-प्रत्यारोपांची धुळवड खेळायला सुरवात केल्याचे समजले. खंबाटा कामगार प्रश्नी पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांवर चिखलफेक करीत आपण कसे कामगारांच्या भल्यावर होतो आणि समोरचा कसा नालायक आहे हे सांगत सुटले आहेत. पण हे दोघेही खंबाटा कामगारांचे गुन्हेगार आहेत.

खरेतर 70 टक्केहून अधिक खंबाटा कामगार हा कोकणी माणूस आहे. त्यांचे संसार उध्वस्त करून त्यांना देशोधडीला लावणारे हे चोर उलट्या बोंबा मारत आहेत. मला हे ऐकवत नव्हते म्हणूनच आज कोकणात येऊन सत्य मांडत आहे.

- अंजली दमानिया

दमानिया म्हणाल्या, खंबाटा एव्हिएशन ही 40 वर्षाहून अधिक काळ मुंबई विमानतळावर ग्राउंड हंडलिंगचे काम करणारी कंपनी. इथे 2700 च्या आसपास कामगार काम करीत होते. 70 टक्केहून अधिक कामगार हा मराठी कामगार होता. बहुतांश कामगारांनी आपले नेतृत्व शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेकडे सोपवले होते. त्याचे अध्यक्ष विनायक राऊत होते. तर काही थोडे कामगार हे महाराष्ट्र समर्थ कामगार सेना व इतर युनियनचे सदस्य होते. दिवसेंदिवस वाढत जाणारी विमानसेवा पाहता खरेतर ही कंपनी तोट्यात जाण्याचे काहीच कारण नव्हते. कंपनी खूपच चांगल्याप्रकारे चालत होती. खंबाटा यांनी वेळोवेळी कामगारांना भरघोस वाढ देण्याचे कबुल केले होते, पण भारतीय कामगार सेनेच्या विनायक राऊत यांनी ही रक्कम कामगारांना देण्याची गरज नाही, असा धोशा लावला. 2014 साली भारतीय कामगार सेना आणि मॅनेजमेंट यांच्यातील तोंडी करारानुसार कामगारांना वाढीव पगाराचा तिसरा टप्पा देण्याची गरज नाही, असे त्या वर्षा अखेरील ताळेबंद पत्रकात नमूद केलेले आहे, असेही दमानिया यांनी सांगितले. 

दमानिया म्हणाल्या, नियमानुसार कामगारांच्या भल्यासाठी काम करायचे सोडून शिवसेनेच्या भारतीय कामगार संघटनेने स्वतःचे भले बघायला सुरवात केली. खंबाटा कंपनीवर कब्जा करून मॅनेजमेंट, मुंबई आंतरराष्ट्रीय विमान प्राधिकरण याच्या बरोबर संगनमत करून खंबाटाची सगळी मशिनरी, लायसेन्सही दुसऱ्या एका नव्या कंपनीला (जी अवैध कंपनी आहे ) देऊन एका रात्रीत खंबाटा कामगारांना देशोधडीला लावण्यात आले.

खंबाटा कामगार रस्त्यावर आले. 25 ते 40 वर्षे नोकरी करून कामगारांच्या हाताला काही लागलेले नाही. त्याची प्रचंड दुर्दशा झाली. काहींनी तर वैतागून आत्महत्या सुद्धा केल्या. याला जबाबदार असणारी भारतीय कामगार सेना मात्र खंबाटाला डावलून सुरु करण्यात आलेल्या नवीन बीडब्ल्युएफसी नावाच्या अवैध कंपनीत आपले दुकान केव्हाच थाटून बसली आहे, असा आरोपही दमानिया यांनी यावेळी केला.

दमानिया म्हणाल्या, हतबल कामगारांनी न्यायासाठी शिवसेनचे नेते आणि मराठी माणूस.. मराठी माणूस.. म्हणून गळा काढीत मराठी माणसाच्या जीवावर राजकारण करणारे शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे धाव घेतली, पण कामगारांना तेथून हुसकावून लावण्यात आले. हे सर्व होत असताना आता निवडणुकांच्या तोंडावर आरडाओरडा करणारे महाराष्ट्र समर्थ कामगार सेनेचे नितेश राणे कुठे गेले होते? कि तेही त्या कटात सामील होते? हा प्रश्न सुद्धा आम्हाला पडलेला आहे, असेही त्या म्हणाल्या. 

दमानिया म्हणाल्या, न्यायालयात धाव घेतलेल्या कामगारांना न्यायालयाने कामगारांची देणी द्यावी, असा निकाल दिला पण देणी देणार कोण? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला. हे सर्व कामगार जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मी ही कामगारांना घेऊन जानेवारी 2017 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना भेटले. यावेळी त्यांनी विनायक राऊत यांच्यावर कारवाई करतो, अशी ग्वाही दिली. पण त्या सगळ्या वल्गनाच ठरल्या. त्यांनी विनायक राऊत यांना कोकणातून निवडणुकीचे तिकीट बहाल केले.खंबाटाची लूट करणाऱ्या श्री ठाकरेंकडून दुसरी काय अपेक्षा करू शकतो? , असेही त्या म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Socail worker Anjali Damania comment