esakal | लाॅकडाउनकाळात सामाजिक जागृती; शिक्षकाच्या कलेचे कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

Social awareness through painting konkan sindhudurg

विशेष म्हणजे लॉकडाउन कालावधीत त्यांनी काढलेली अनेक चित्रे सामाजिक जागृती करणारी ठरत आहेत. 

लाॅकडाउनकाळात सामाजिक जागृती; शिक्षकाच्या कलेचे कौतुक

sakal_logo
By
नेत्रा पावसकर

तळेरे (सिंधुदुर्ग) - कला, छंद हे समाजप्रबोधनाचे माध्यम असते. कला माणसाला जीवन कसे जगावे हे शिकवते. मन रमवणे व आत्मिक समाधान मिळवण्याचे साधन म्हणजे कला. कला असणे यापेक्षा ती जोपासणे हे फार महत्वाचे असते. अशा प्रकारची चित्रकला लोरे मोगरवाडी (ता. वैभववाडी) शाळेतील उपक्रमशील शिक्षक युवराज पचकर यांनी जोपासली आहे. विशेष म्हणजे लॉकडाउन कालावधीत त्यांनी काढलेली अनेक चित्रे सामाजिक जागृती करणारी ठरत आहेत. 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासनाने लॉकडाउन जाहीर केले. सर्व व्यवहार ठप्प झाले. या काळात अनेकांनी छंद जोपासले. युवराज पचकर यांनीही शालेय कामकाज पाहत मिळालेल्या वेळेचा उपयोग त्यांनी चित्रकलेचा छंद जोपासण्यासाठी केला. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या कलेचा उपयोग सामाजिक जनजागृती करण्यासाठी केला.

त्यांनी चित्रांद्वारे कोरोनाबाबत जनजागृती केली. वैयक्तीक व सामूहीक कोणती काळजी घ्यावी? शासनाच्या नियमांचे पालन कसे करावे? कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींशी कसे वागावे? बिकट परिस्थितीत माणुसकी कशी जपावी? असे विविध संदेश देणाऱ्या चित्रांना प्राधान्य दिले. ही चित्रे त्यांनी व्हॉट्‌सऍपच्या व फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्ध केली होती. अनेकांनी त्यांच्या या कल्पनेचे कौतुक केले. 

या कलेमुळे मुलांचे अध्ययन रंजक व आनंदी होण्यासाठी खूप मदत झाली. मुलांचे हस्ताक्षर सुधारते. व्यक्तीमत्त्व विकास होण्यास मदत मिळते. मुलांच्या अंगी सौंदर्यदृष्टी निर्माण होते. याआधी त्यांनी चित्रकलेवर आधारित मुलांच्या समस्यांचे संशोधन करून सादर केलेल्या नवोपक्रमास जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक व राज्यस्तरावर निवड झाली होती. त्यांनी अनेक मुलांना चित्रकलेच्या शासकीय परीक्षांचे महत्व पटवून दिले व अनेकांना त्यांनी परीक्षेस बसण्यास प्रोत्साहन दिले. त्यांचे अनेक विद्यार्थी आज अशा परीक्षेतून यशस्वी झाले आहेत. मुलेही हा छंद आवडीने जोपासत आहेत. आपल्या या कलेचा उपयोग जास्तीत जास्त ग्रामीण भागातील मुलांना कसा करता येईल यासाठी ते प्रयत्नशील आहेत. 

कमी खर्चात सुंदर चित्रकृती 
या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी कमी किमतीत व सहज उपलब्ध होणाऱ्या काळ्या पेन्सिल, रंगीत पेन्सिल, रंगीत खडू, जलरंग, स्केचपेन आदी साधनांचा उपयोग केला आहे. चित्रांमध्ये निसर्गचित्रे, व्यक्तीचित्रे, वस्तूचित्रे, प्राणी, फुले, पक्षी अशा चित्रांचा समावेश आहे. या चित्रांसाठी घरातील विविध रंग आणि सहित्य वापरले आहे. त्यामुळे कमी खर्चात सुंदर चित्रकृती करता येते हे पचकर यांनी सिद्ध केले; मात्र त्यासाठी कलात्मक दृष्टी असावी लागते, त्यातून सर्व घडत जाते, असे मत पचकर यांनी व्यक्त केले. 

चित्रप्रदर्शनाचा संकल्प 
भविष्यात चित्रप्रदर्शन भरवण्याचा पचकर यांचा संकल्प आहे. अनेक संस्थांनी कोरोनावर आधारित घेतलेल्या काव्यलेखन व निबंध स्पर्धेतही पचकर यांनी जिल्हा, राज्यस्तरावर यश मिळवले. कलेमुळे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो. पचकर हे "उमेद' या सामाजिक संस्थेचे सदस्य असून कोरोना परिस्थितीत संस्थेने राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमात ते सक्रीय होते. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे. गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, मुख्याध्यापक किशोर पेडणेकर व शिक्षकांनी कौतुक केले. 

संपादन - राहुल पाटील

loading image
go to top