माती खचल्याने कालव्यासह सटमटवाडीतील घरांना धोका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

बांदा - सटमटवाडी येथील तिलारी उपकालव्यालगतची भरावाची माती पावसात खचल्याने कालव्यासह लगतच्या घरांना व बागायतींना मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वीच उपकालव्याचे काम करण्यात आले होते; मात्र निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याने पावसाळ्यात कालवा वाहून जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

बांदा - सटमटवाडी येथील तिलारी उपकालव्यालगतची भरावाची माती पावसात खचल्याने कालव्यासह लगतच्या घरांना व बागायतींना मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वीच उपकालव्याचे काम करण्यात आले होते; मात्र निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याने पावसाळ्यात कालवा वाहून जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

दरवर्षी याठिकाणी डोंगरातील माती कालव्यात कोसळत असल्याने यावर्षी कालवा विभागाकडून भुयारी कालव्याचे बांधकाम करण्यात आले आहे. डोंगरातील माती कोसळू नये, यासाठी "व्ही' आकारात डोंगर कापून डोंगरातील माती मोठ्या प्रमाणात काढण्यात आली आहे; मात्र पावसाळ्यात डोंगरातील माती खाली आल्याने या कामाच्या मर्यादा उघड झाल्या आहेत.

यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने डोंगरातील माती कालव्यात कोसळली आहे. तसेच कालव्या लगतच्या बागायतीत देखील मोठ्या प्रमाणात माती कोसळल्याने जमीन देखील नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे. कालव्यात माती मोठ्या प्रमाणात साचल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. कालव्या लगत शेतकऱ्यांचे कित्येक माड, काजू, आंबा कलमे ही मातीमध्ये गाडली गेली आहेत. तिलारी उपकालव्याच्या लगतच घरे असल्याने या घरांना देखील मातीच्या भरावाचा धोका निर्माण झाला आहे.

सटमटवाडी येथून जाणाऱ्या कालव्याचे काम गेली कित्येक वर्षे सुरू आहे. निकृष्ट काम करण्यात येत असल्याने दरवर्षी या डोंगरातील माती ही कालव्यात कोसळत असते. यावर्षी देखील पावसाळ्यापूर्वी काम करण्यात आले होते. माती कालव्यात कोसळल्याने कालव्यात बांधण्यात आलेले सिमेंटचे खांब देखील मोडले आहेत.

भर पावसाळ्यात मातीचा भराव खचून कालवा फुटण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. निकृष्ट कामामुळे याचठिकाणी 2010 मध्ये कालवा फुटण्याचा प्रकार घडला होता. कालवा विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: soil erosion in Sattamwadi affects on canal and houses