देवरुख उजळणार सौर पथदिव्यांनी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

देवरूख - देवरूख नगरपंचायतीतर्फे शहरातील पथदीपांच्या जागी नवे सौर पथदीप बसविण्यात येणार असून त्यासाठी ११० ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया व देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाची मदत घेण्यात येत असल्याची माहिती नगरपंचायतीने दिली. 

देवरूख - देवरूख नगरपंचायतीतर्फे शहरातील पथदीपांच्या जागी नवे सौर पथदीप बसविण्यात येणार असून त्यासाठी ११० ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया व देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाची मदत घेण्यात येत असल्याची माहिती नगरपंचायतीने दिली. 

नगरपंचायतीवर सत्ताधारी असलेल्या देवरूख विकास आघाडीने गेल्या वर्षभरात सुमारे दोन कोटींची विकासकामे मंजूर करून आणली आहेत. त्याशिवाय नगरपंचायतीतर्फे गेले वर्षभर स्वच्छ देवरूख -सुंदर देवरूख अभियान राबविण्यात येत आहे. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांच्याशी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी चर्चा करून सोलर दिव्यांबाबतची माहिती दिली. भागवत यांनी स्टेट बॅंकेच्या सीएसआय फंडातून हे दिवे मिळावेत अशी मागणी केली आहे. या मागणीचा स्टेट बॅंकेने विचार करून २५ लाखांचा निधी नगरपंचायतीला दिला आहे. या २५ लाखात ११० ठिकाणी नवे सौर पथदीप बसविण्यात येणार असून देवरूख शहर लवकरच सौर पथदिपांनी उजळणार आहे. सध्या शहरात ७१७ ठिकाणी विजेचे पथदिप बसविण्यात आले आहेत. यात सोलर दिव्यांची भर पडणार असल्याने देवरुखातील काळोखाचा प्रश्‍न निकाली निघून विजेचीही बचत होणार आहे. जिथे खरोखरच गरज आहे आणि दुर्गम भाग आहे अशी ठिकाणे निश्‍चित करून हे दिवे बसविले जाणार आहेत. 

नगरपंचायतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी रस्ते विकासासाठी तब्बल २ कोटी रुपयांचा निधी मिळवला. यातून शहरातील जवळपास सर्व रस्ते चकाचक होत आहेत. यातील १ कोटी खर्च करून आत्तापर्यंत २३ रस्ते हॉटमिक्‍स पद्धतीने चकाचक झाले आहेत. सद्यस्थितीत ९ रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असून पावसाआधी उर्वरित कामे पूर्ण होतील, असा विश्‍वास व्यक्‍त करण्यात येत आहे.

Web Title: The solar street lights will brighten up