सोनवडे घाटमार्गाचे भवितव्य पर्यावरण खात्याच्या अहवालावर

सोनवडे घाटमार्गाचे भवितव्य पर्यावरण खात्याच्या अहवालावर

कणकवली - केंद्रीय वन्यजीव संस्थेने गतवर्षी सोनवडे घाटमार्गाला ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर आता केंद्रीय पर्यावरण विभागाच्या दाखल्याची आवश्‍यकता आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय पर्यावरण विभागाचे पथक जानेवारीअखेर सोनवडे घाटमार्गाच्या सर्वेक्षणासाठी दाखल होणार आहे. पर्यावरण खात्याचा दाखला मिळाल्यानंतर सोनवडे घाटमार्गाच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. 

घाटमार्गाचे काम वेगाने होण्याच्या दृष्टीने वन खाते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सोनवडे घाटमार्गाचे संयुक्‍त सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे, तर नांदेड आणि कोल्हापूर येथील पर्यायी जमिनीवर वनीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने ३ कोटी ३८ लाख ६८ हजार ९५९ रुपयांचा निधी वन खात्याकडे वर्ग केला आहे. याखेरीज सोनवडे (सिंधुदुर्ग) ते शिवडाव (कोल्हापूर) या हद्दीत जी वृक्षतोड होईल, तेवढ्या झाडांची नव्याने लागवड करण्यासाठीही २० ते २२ कोटींची तरतूद बांधकाम खात्याला करावी लागणार आहे. 

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या शिवडाव-सोनवडे-घोटगे या घाटमार्गासाठी गेली ४० वर्षे लढा सुरू आहे. सन १९९९ च्या युती शासनाच्या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कोल्हापूर व कोकणला जोडणारा सर्वांत जवळचा मार्ग म्हणून सोनवडे-घोटगे घाटास मान्यता देऊन प्रत्यक्ष कामाची सुरवात केली होती; पण त्यानंतर या घाटाचे काम वन हद्दीतील जमीन आणि वन्यजीव प्राण्यांचा संचार यामध्ये प्रलंबित राहिले होते. सोनवडे घाटमार्गाची एकूण लांबी १२.७६ कि.मी. असून त्यामध्ये सिंधुदुर्ग हद्दीतील घोटगेपर्यंतचे दोन किलोमीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे, तर कोल्हापूरमधील भुदरगड तालुक्‍यातील ८.४३ कि. मी. घाट रस्त्यापैकी ५ कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. सोनवडे घाटमार्गात सिंधुदुर्ग हद्दीतील २० हेक्‍टर जागा वनक्षेत्रात येते. या बदल्यात दहीकळंब (नांदेड) येथे १० हेक्‍टर व लिनगव्हाण (कोल्हापूर) येथे १० हेक्‍टर जमीन देऊन वन विभागाचा अडसर दूर करण्यात आला होता. त्यानंतर वन्यजीवांचा संचार होत असल्याच्या कारणावरून वन्यजीव खात्याने या घाटाचे काम प्रलंबित ठेवले होते. गतवर्षी वन्यजीव खात्याच्या पथकाने संपूर्ण घाटमार्गाची पाहणी केली आणि काही अटी व शर्तींच्या आधारे हा घाट रस्ता होण्यास काही हरकत नसल्याचा अहवाल इंद्रनील मोडल आणि आकांक्षा सक्‍सेना या पथकाने सादर केला. त्या अनुषंगाने डेहराडून येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व वन्यजीव संस्थेचे संचालक यांच्यामध्ये बैठक होऊन घाट रस्त्यासाठी हिरवा कंदील मिळाला. वन्यजीव संस्थेच्या अहवालानंतर आता केंद्रीय पर्यावरण विभागाचा दाखला मिळाल्यानंतर घाटमार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय पर्यावरण खात्याचे पथक या घाटमार्गाची पाहणी करणार आहे. 

पर्यावरण दाखल्यानंतरच निविदा
केंद्रीय पर्यावरण पथकाने घाटमार्गासाठी सकारात्मक दाखला दिल्यानंतर लगेच घाटमार्गाच्या निविदा कामांना सुरवात होणार आहे. त्या अनुषंगाने बांधकाम खात्याकडून घाटमार्गाच्या ३० मीटर रुंदीच्या क्षेत्राचे सीमांकन केले जात आहे, तर वन खात्याकडून त्या क्षेत्रात येणाऱ्या वृक्षांची मोजणी केली जात आहे. पर्यावरण खात्याच्या दाखल्यानंतर या झाडांची तोड केली जाईल. तसेच आवश्‍यक त्या ठिकाणी ओव्हरपास, अंडरपासच्या डिझाइनची निश्‍चिती करून निविदा काढली जाणार आहे.
 

कुडतरकर, नाटेकरांचाही लढा
गेली ४० वर्षे रेंगाळलेल्या शिवडाव-सोनवडे घाटाचे काम मार्गी लागावे यासाठी शिवडाव (कोल्हापूर) येथील लहू कुडतरकर यांनी २००६, २००७, २००९ या सालात बेमुदत उपोषण केले होते, तर २०१५ साली त्यांनी घाट रस्त्यासाठी पाटगाव जलाशयातील पाण्यात उपोषण करून सरकारचे लक्ष वेधले होते, तर सिंधुदुर्गातील प्रा. महेंद्र नाटेकर यांनीही दरवर्षी उपोषण, रास्ता रोको करून घाटमार्गासाठी लढा सुरू ठेवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com