सोनुर्ली जत्रोत्सवाने जपला साधेपणा

Sonurli Jatrotsav konkan sindhudurg
Sonurli Jatrotsav konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव आज झाला; मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव करण्यात आला. 
जत्रोत्सवानिमित्ताने श्री देवी माऊलीच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती.

माऊलीचे उत्सवानिमित्त सजविलेले देखणे मनोहारी रूप अधिकच खुलून दिसत आहे. मंदिर व मंदिर परिसरातही आकर्षक विद्युत रोषणाई आहे. कोरोनामुळे भाविकांनी दर्शनाला येऊ नये तसेच गर्दी टाळावी, या देवस्थान कमिटीने केलेल्या आवाहनाला भाविकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. 
लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जत्रोत्सवात काही स्थानिक मोजक्‍याच नोंदणीकृत भाविकांची लोटांगणे घालण्यात आली.

सोनुर्ली व मळगाव गावातील काही मोजक्‍याच भाविकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दर्शन घेतले. प्रशासनानेही आरोग्यविषयक चोख व्यवस्था होती. कडेकोट पोलिस बंदोबस्तही होता. यावर्षी कोणत्याही प्रकारचे पार्किंग, दर्शन मंडप, दुकाने, हॉटेल्स नसल्याने मंदिर परिसर मात्र सुनासुना होता. कोरोनाची दुसरी लाट संभवत असल्याने प्रशासन व देवस्थान कमिटीकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात होती. यावर्षी हॉटेल, दुकाने लावू नयेत, असे आवाहन देवस्थान कमिटीने केल्यामुळे स्थानिक भाविकांकरिता सोय म्हणून केवळ चार दुकाने होती. 

रात्री होणाऱ्या मुख्य पालखी उत्सवावेळीदेखील सोनुर्ली व मळगाव येथील काही प्रमुख मानकरी व भाविकांच्या उपस्थितीत काही ठराविक जणांची लोटांगणे घालण्यात आली. त्यासाठी आवश्‍यक नाव नोंदणी स्थानिक भाविकांनी देवस्थान कमिटीकडे केली होती. उर्वरित लोटांगण घेण्यास इच्छुक असलेल्या भाविकांनी उपवास करून रात्री दोन वाजता तो सोडावा, असे आवाहन देवस्थान कमिटीने केले होते. 

देवस्थान कमिटीने जत्रोत्सवासाठी खास नियमावली राबविताना सोनुर्ली गावातील भाविक भक्तांची गर्दी होऊ नये, यासाठी दिवसातील ठराविक वेळ त्या-त्या वाडीसाठी निश्‍चित केला होता; मात्र लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांना दर्शनासाठी न येण्याचे कळकळीचे आवाहन केले होते. भाविकांकडूनही देवस्थान कमिटीच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मंदिर परिसरात दरवर्षी दिसणारी गर्दी यावर्षी दिसून आली नाही. 

प्रशासनाकडून चोख व्यवस्था 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून गर्दी टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासाठी पोलिसांची विशेष कुमक तैनात करण्यात आली होती. सोनुर्ली माऊलीच्या मंदिराकडे येणाऱ्या दोन्ही मार्गावर पोलिसांसोबतच देवस्थान कमिटीचे स्वयंसेवक उपस्थित होते. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांची कसून चौकशी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत होता. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आरोग्य विभागाकडून पथक तैनात करण्यात आले होते. माऊलीच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक स्थानिक भाविकाची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येत होती. सॅनिटायझरचाही वापर सक्तीचा करण्यात आला होता. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर नियम पाळूनच देवस्थान कमिटीच्या स्वयंसेवकांकडून विशेष काळजी घेत माऊलीच्या दर्शनासाठी स्थानिक भाविकांना सोडण्यात येत होते. 

व्यावसायिकांना फटका 
सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव हा जिल्ह्यातील प्रमुख जत्रोत्सव यापैकी महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी माऊलीच्या मंदिराच्या दोन्ही बाजूने एक किलोमीटरच्या अंतरावर शेकडो दुकाने, हॉटेल्स व लहान-मोठे व्यावसायिक आपले व्यवसाय थाटायचे. हजारो भाविकांची उपस्थिती व त्यामुळे होणारी लाखो रुपयांची उलाढाल होते. यंदा कोरोनामुळे मोठा फटका बसला. भाविकांना दर्शनासाठी बंदी केल्यामुळे एसटी प्रशासनालाही त्याचा मोठा फटका बसला असून लाखोचे नुकसान झाले. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com