साऊथ कोकण आता "बर्डींग'चा हॉटस्पॉट 

South Konkan is now a hotspot for "birding"
South Konkan is now a hotspot for "birding"

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - साऊथ कोकण आता "बर्डींग हॉटस्पॉट' बनू लागला आहे. तळकोकणात विशेषत: सिंधुदुर्गात पर्यटन समृद्धीच्या दृष्टीने ही खुशखबर म्हणायला हवी. दरवर्षी शेकडो पक्षीप्रेमींची पावले या भागाकडे वळत आहेत. 

राज्यात उद्यापासून (ता.5) पक्षी सप्ताह सुरू होत आहे; पण साऊथ कोकण अर्थात सिंधुदुर्गात गेली चार वर्षे बर्डींगच्या क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे. याची कारणेही तशीच आहेत. येथे पर्यटन विकासाच्या गप्पा खूप झाल्या. यासाठी कागदी घोडदौड नाचविणे वर्षानुवर्षे सुरू आहे. इथला निसर्ग व त्यातील विविधता ही इथली ताकद फारशी वापरली गेली नाही; मात्र गेल्या चार वर्षांत सिंधुदुर्गात अनेक तरुणांनी पक्षी पर्यटन क्षेत्रात पावले टाकली आहेत. याचा परिणाम म्हणून देशभरातील पक्षीप्रेमी सिंधुदुर्ग येवू लागले आहेत. बर्डींगला इतक्‍या कमी काळात सिंधुदुर्गात प्रतिसाद का मिळतोय? याचीही सक्षम कारणे आहेत. 

त्याचा उलगडा करताना पक्षी अभ्यासक डॉ. गणेश मर्गज म्हणाले, ""देशभरात 1300, महाराष्ट्रात 550, आणि आपल्या तळकोकणात 300 पेक्षा जास्त पक्षी प्रजाती आहेत. नैसर्गिक विविधता असल्यामुळे पक्षी विविधतेचे प्रमाण जास्त आहे. सिंधुदुर्गाच्या पूर्वेला डोंगर, दऱ्या आणि आद्र पानगळीचे जंगल तर गोव्याकडे सदाहरीत जंगल आहे. या दोन्हीच्या मधल्या भागात तिलारी खोऱ्यात याचे मिश्रण असलेले जंगल दिसते. यामुळे तिन्ही जंगलाच्या प्रकारात असणाऱ्या पक्षी प्रजाती येथे दिसतात. शिवाय पाणथळ, दलदलीच्या जागा, समुद्र, नद्या, खारफुटी, पठारे, डोंगर, दऱ्या अशी विविधता असल्याने या भागातील वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती येथे विपुल आहेत. पाणथळ जागांच्या ठिकाणी स्थलांतरीत पक्ष्यांचे प्रमाणही मोठे आहे.'' 

पक्षी विश्‍व आणखी उघडताना ते म्हणाले, ""सिंधुदुर्गात प्रदेशानिष्ठ पक्षी प्रजातींची संख्या लक्षवेधी आहे. मलबार ट्रॉगन, तिबेटी खंड्या, श्रीलंकन बेडूकमुखी पक्षी ही त्यातली काही नावे. महाधनेश, विविध प्रकारचे सुतार पक्षी, मलबारी धनेश जवळपास सात प्रकारचे धिवर असे कितीतरी वैशिष्ट्यपूर्ण पक्षी पर्यटकांना येथे खुणावतात. पाट तिलारी, धामापूर येथील पाणवठ्याच्या ठिकाणी पक्षी येण्याचे प्रमाणही मोठे आहे. सागरी पक्षी विश्‍व हे आणखी समृद्ध आहे. मिठागरे, खाड्या, खारफुटीचे जंगल, दाट जंगलात तर पक्षी वैभव खूपच संपन्न आहे.'' 

सिंधुदुर्गातील प्रसिद्ध ठिकाणे 
बर्डिंगसाठी सिंधुदुर्गात आंबोली, पाटचा तलाव, तिलारीचे जंगल असे काही स्पॉट खूप प्रसिद्ध आहेत. आंबोलीत मलबार नेचर कंझर्वेशन क्‍लब तसेच इतर भागात अनेक पक्षीप्रेमी याला चालना देत आहेत. बर्डिंगवर आधारित पर्यटन विकासासाठी स्वयंस्फूर्तीने प्रयत्नही केले जात आहेत. वानोशी कुडासे (ता.दोडामार्ग) येथील फॉरेस्ट स्टे त्याचेच एक उदाहरण म्हणता येईल. पांग्रड आंब्याचे पाणी येथे स्थानिकांनी बर्ड स्टुडिओ संकल्पना सुरू केली आहे. दांडेली गणेश गुडी (कर्नाटक) येथील ओल्ड मॅगझिन हाऊस केरळमधील फत्तेगड याच्याशी साधर्म्य असलेला हा स्टुडिओ पक्षीप्रेमींना भुरळ घालत आहे. 

खाडी, समुद्र, पाणथळ जागा, नद्या या सगळ्या इकॉलॉजित असलेले पक्षीविश्‍व इथली संपन्नता आहे. याचा नीट अभ्यास व्हायला हवा. यासाठी इथे खूप संधी आहे; पण पर्यटन विकास करताना या पक्षी विश्‍वाला हानी पोहोचणार नाही, हेही पाहायला हवे. 
- प्रसाद गावडे, पर्यटन गाईड 

वड, पिंपळ, देवरायामधील मोठी झाडे ही सिंधुदुर्गात पक्षांची आश्रयस्थाने आहेत. दुर्दैवाने यांची संख्या कमी होत आहे. ही झाडे राखायला हवी. 
- डॉ. गणेश मर्गज, पक्षी अभ्यासक 

तिबेटी खंड्या बर्डिंगमधला हिरो 
सिंधुदुर्गात बर्डिंगच्या विश्‍वात तिबोटी खंड्या हिरो मानला जातो. त्याला पाहायला येणाऱ्या पक्षीप्रेमींची संख्या मोठी आहे. त्या पाठोपाठ मलबार ट्रॉगनचा नंबर लागतो. अर्थात हे पक्षी सिंधुदुर्गात ठराविक भागातच पाहायला मिळतात. 

देशभरातील पक्षीप्रेमी सिंधुदुर्गात 
"कोकणी रानमाणूस' या ब्रॅंडखाली अनटच कोकणचे पर्यटन दाखवणारे प्रसाद गावडे सांगतात, की बर्डिंगसाठी साउथ कोकणमध्ये असलेली ताकद आता पर्यटनाच्या माध्यमातून दिसू लागली आहे. देशभरातील पक्षीप्रेमी सिंधुदुर्गात येत आहेत. त्याची संख्याही वाढत आहे. विशेष पाणवठ्यावरील स्थलांतरीत पक्षी पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हिवाळ्यात त्यांचा हंगाम असतो. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com