चालक कम बॉडीगार्ड अशा दुहेरी भूमिकेतील डेअरिंगबाज सारथी लतिका

राजेश शेळके | Sunday, 25 October 2020

जिल्ह्यातील पहिली महिला चालक, पोलिस उपअधीक्षक (गृह) यांच्यासाठी नियुक्ती, बॉडीगार्डही  

रत्नागिरी : टेलरिंगच्या पारंपरिक व्यवसायाच्या धाग्यामध्ये न गुंतता तिने आपली वेगळीच वाट चोखाळली. आज पोलिस दलामध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे सारथ्य करणारी (चालक) जिल्ह्यातील ती पहिली महिला ठरली. डेअरिंगबाज, खाकीबद्दलचा मान, ठासून भरलेला आत्मविश्‍वास, प्रभावी व्यक्तिमत्त्‍व अशी ओळख मिळवली लतिका सखाराम मोरे हिने नवदुर्गेचे हे आगळे रूप.   

हेही वाचा - कुडाळच्या नवरात्रोत्सवाला 350 वर्षांचा वारसा -

लहानपणापासूनच खाकी वर्दीबद्दल लतिकाला निस्सीम प्रेम. त्यासाठी काही करण्याची जिद्द होती. या जिद्दीला तिने चिकाटीची जोड दिली आणि आपले स्वप्न पूर्ण करत पोलिस दलात भरती झाली. तेथे वाहनांबद्दल असलेली आवड तिला स्वस्थ बसू देत नव्हती. बंदोबस्त, एसस्कॉडच्या गाड्यांमध्ये बसून तिने ड्रायव्हर व्हायचा निर्धार केला आणि तो अंमलात आणला. चिपळूण तालुक्‍यातील गोवळकोट येथील ग्रामीण भागातील लतिकाने डीबीजे कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. खाकी वर्दीचा ध्यास होता. त्यासाठी ट्रेनिंग घेत होती.

कॉलेज डे मध्ये रमण्यापेक्षा ती ट्रेनिंगमध्ये ढोपर फोडणे, रायफल चालवणे अशी तयारी करत होती. २०१४ मध्ये पोलिसात भरती झाली. पोलिस दलातील एमटीओंनी (वाहन विभाग) कोकण परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षकांना महिला चालकासाठी अर्ज दिला. ६२ मुलींची पहिली बॅच ट्रेनिंगला काढली. ड्रायव्हिंग टेस्टनंतर पोलिस उपअधीक्षक (गृह) यांच्यासाठी चालक म्हणून तिची नियुक्ती झाली.

हेही वाचा - सिंधुदुर्गाला निधी देण्यास कटीबद्ध ः सहकारमंत्री -

नाईट राऊंड, जिल्हा गस्तीला महिला ड्रायव्हर कशी न्यायची? असा प्रश्‍न होता; मात्र डेअरिंगबाज लतिकाने ते धाडस दाखविले. जिल्ह्यात पाच महिलाचालक असल्या तरी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या वाहनाचे सारथ्य करणारी लतिका ही जिल्ह्यातील पहिली महिला चालक ठरली आहे. चालक कम बॉडीगार्ड अशी दुहेरी भूमिकाही ती बजावते आहे. 
 

"पोलिस खात्यात जाण्यासाठी ग्रामीण मुली पुढे येत नाहीत. पण पोलिस खात्यात आणि या वर्दीमध्ये जो मान आहे, तो कुठेच नाही. " 
-लतिका मोरे, महिला पोलिस कर्मचारी (चालक)  
 

 

संपादन - स्नेहल कदम