‘गाव माझं वेगळं’ः बंधाऱ्यांनी दिली गावाला ओळख

‘गाव माझं वेगळं’ः बंधाऱ्यांनी दिली गावाला ओळख

एक बंधाऱ्याने वाडीचे आणि मग शंभरहून अधिक बंधाऱ्यांनी साऱ्या गावचेच चित्र बदलले. यासाठी ग्रामस्थांची मेहनत घेतली. परिणामी मेमध्ये विहिरींमध्ये पाणी उपलब्ध झाले. कधीही न पिकणारा भाजीपाला पिकू लागला. उत्पन्नाचा स्रोत वाढला. समृद्धीची पावले उमटू लागली आणि गावची ओळख बंधाऱ्यांचे गाव अशी झाली. आरे-वाकी-पिंपळवट या ग्रुप ग्रामपंचायतीची ही नवी ओळख आता राज्यभर झाली आहे. 

आरे-वाकी-पिंपळवट गाव गेली तीन वर्षे जलसंवर्धनासाठी बंधारे अभियान राबवत आहे. उत्स्फूर्त लोकसहभाग असेल तर मोठे काम देखील कसे सहज शक्‍य होते, याचे उदाहरण या ग्रामस्थांनी सर्वांसमोर ठेवले आहे. गेली तीन वर्षे प्रत्येकी ६० पेक्षा जास्त बंधारे बांधणाऱ्या ग्रामस्थांनी या वर्षी तब्बल ७५ बंधारे बांधण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे आरे-वाकी-पिंपळवट या गावाची ओळख बंधाऱ्याचे गाव म्हणून झाली आहे. 

आरे-वाकी-पिंपळवट या गावातून एकमेव नदी वाहते. नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत वाहणाऱ्या नदीचे पात्र उन्हाळा वाढू लागला की कोरडे पडत जाते. गेली अनेक वर्षे मेमध्ये टंचाईची धग गावकरी सोसत होते. तीन वर्षांपूर्वी आरे-वाकी-पिंपळवट गावाने ६० बंधारे बांधले. त्यामुळे गावातील टंचाई संपून गेली. परिणामी दरवर्षी लोकसहभागातून बांधलेल्या बंधाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली.

२०१७ या वर्षात गावातील १५ पैकी १३ वाड्यांमध्ये सरासरी पाच ते सहा बंधारे लोकांनी बांधले आहेत. आरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, हेमचंद्र मोरे, मिलिंद पडवळ, सुधीर भोसले, श्रीकृष्ण परचुरे व गजानन कळझुणकर यांनी वैयक्तिक बंधारे बांधले. बंधाऱ्यांमुळे गावातील ३५ विहिरींतील पाण्याची पातळी वाढली. एक वर्ष ग्रामपंचायतीने २५ हजार रुपये खर्च करून बंधाऱ्यांना लागणारे प्लास्टिक कापड पुरविले होते. त्यानंतर लोकसहभागातूनच बंधाऱ्यांसाठी आवश्‍यक खर्च करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.

७५ बंधारे बांधण्यासाठी प्रकाश सावंत, संदीप देवकर, साईनाथ कळझुणकर, जिल्हा परिषदेच्या पाच शाळांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक मदत व वेळ दिला. बंधारे बांधल्याने वाकी, पिंपळवट परिसरात भाजीपाला व फळबाग लागवडीचे क्षेत्र सात एकरने वाढले आहे. रमेश पागडे, विजय पागडे व संजय गमरे आदी शेतकरी पालेभाज्या, तोंडली, झेंडू, कलिंगड, दुधीभोपळा, पडवळ, कोबी आदी पिके मेपर्यंत घेतात. त्यासाठी शेतामध्ये ठिबक सिंचनाची व्यवस्था त्यांनी उभी केली. शासनाच्या फळबाग लागवडीतून ८० हेक्‍टर क्षेत्रावर सुमारे ७५ शेतकऱ्यांनी काजू लागवड केली. शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. 

यापूर्वी नारळ व सुपारीच्या बागांना मेमध्ये पाणी शिंपणे कठीण होत असे. बंधाऱ्यांमुळे बागायतदारांना शिंपण्यासाठी पाणी उपलब्ध झाले. परिणामी नारळ, सुपारीच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ झाली आहे. नागदेवाडी येथील नळपाणी योजनेचा पाणीसाठा वाढल्याने मेपर्यंत पाण्याचे नियोजन करणे ग्रामपंचायतीला शक्‍य झाले आहे. काही शेतकऱ्यांनी काजू लागवडी अंतर्गत भाजीपाल्याचे आंतरपीक घेतले आहे. 

अधिकाऱ्यांचे हॉट डेस्टिनेशन
तीन वर्ष एकाच नदीवर चढत्या क्रमाने ग्रामस्थ बंधारे बांधतात. त्यामुळे बंधाऱ्यांच्या या गावाला जिल्ह्यातील अनेक अधिकारी भेट देण्यासाठी येतात. गावकऱ्यांची यशोगाथा पाहून समाधान व्यक्त करतात. 

१५ हेक्‍टरवर काजू अन्‌ आंबा
गावात २०१७ मध्ये ७१ हेक्‍टरवर आंबा व काजूची लागवड झाली. या वर्षी २२ हेक्‍टरवर लागवड करण्यात येत आहे. पैकी १५ हेक्‍टर क्षेत्राला बंधाऱ्यांमधील पाण्याचा फायदा होत आहे. त्याच वेळी या पाण्यामुळे दोन हेक्‍टरवर भाजीपाला फुलला आहे तर १६ हेक्‍टरवर नारळ, सुपारीची लागवड झाली आहे, अशी माहिती सरपंच श्रीकांत महाजन यांनी दिली.

गाव असे 
 एकूण क्षेत्र :  २४३४ हेक्‍टर
 लोकसंख्या : १५७७
 बंधाऱ्यामुळे गेल्या तीन वर्षात ओलिताखाली आलेले क्षेत्र : २+ १६ + १५ = ३३ हेक्‍टर
 वाढलेले शेती क्षेत्र
 सुमारे दोन हेक्‍टरवर भाजीपाला
 सुमारे १६ हेक्‍टरवर 
नारळ, सुपारी 

आजवर आम्ही केवळ नाचणी करत होतो. बंधाऱ्यांमुळे डोंगराळ व कातळाच्या जमिनीत सर्व प्रकारची, गुणवत्तापूर्ण पिके सेंद्रिय खतावर आम्ही घेऊ लागलो. त्याला स्थानिक बाजारपेठेत चांगले मूल्यही मिळते. तीन महिन्यात ६० ते ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
- संजय गमरे
, शेतकरी

सुरुवातीला अभियान राबविणे एवढाच हेतू होता; मात्र साठणाऱ्या पाण्याचा उपयोग लक्षात आल्यावर अभियान गावकऱ्यांचे झाले. आता स्वखर्च आणि स्वमेहनतीतून ग्रामस्थ बंधारे बांधतात. 
- श्रीकांत महाजन,
सरपंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com