राष्ट्रीय महामार्गावर आता 'अशी' आहे वेगमर्यादा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

ज्या वळण रस्त्याची त्रिज्या 50 मीटर पेक्षा कमी आहे, अशा सर्व रस्त्यांवर वाहनांचा वेग ताशी 30 किलोमीटर निश्‍चित केला आहे. सर्व रस्त्यांवरील बोगद्यामध्ये वेग मर्यादा ताशी 80 किलोमिटर निश्‍चित आहे.

सिंधुदुर्गनगरी - रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने तसेच सार्वजनिक सुरक्षेसाठी वाहनांच्या वर्गानुसार महत्तम वेग मर्यादा निश्‍चित करणे आवश्‍यक आहे. त्या अनुषंगाने अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांकरिता वाहनांच्या वर्गानुसार महत्तम वेग मर्यादा निश्‍चित केली आहे. 

वेग मर्यादा अशी - 

प्रवेश नियंत्रण असलेल्या द्रुतगती मार्गावर प्रवासी मोटार वाहने ज्यांची प्रवासी क्षमता जास्तीत जास्त 8 प्रवासी इतकी आहे. अशा एम - 1 श्रेणीतील वाहनांची वेग मर्यादा समतल भागात ताशी 100 किलोमीटर अशी असेल. तर घाट भागातील वेग मर्यादा 50 किलोमीटर प्रती तास अशी आहे. तर प्रवासी वाहने ज्यांची क्षमता 9 प्रवासी किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी आहे. अशा एम-2 व एम-3 श्रेणीतील वाहने यांची वेग मर्यादा 80 किलोमीटर प्रतीतास समतल भागात व घाट भागात ताशी 40 किलोमीटर अशी करण्यात आली आहे.

माल वाहतुकीसाठीची सर्व एन श्रेणीतील वाहने यांची वेग मर्यादा ही 80 किलोमीटर प्रती तास समतल भागात व घाट भारात ताशी 40 किलोमीटर अशी असणार आहे. चार मार्गिका असणारे अर्थात चारपदरी राष्ट्रीय महामार्गावर एम - 1 श्रेणीतील वाहनांसाठीची वेग मर्यादा समतल भागात 90 व घाट भागात 50 कि.मी. प्रती तास, एम - 2 व एम  - 3  श्रेणीतील वाहनांची वेग मर्यादा अनुक्रमे 80 व 40 किलोमीटर प्रतीतास, एन श्रेणीतील वाहनांसाठी अनुक्रमे 80 व 40 किलोमीटर प्रतीतास, दुचाकी वाहनांस आठी 70 व 40 किलोमीटर व चार चाकी मोटर रिक्षांसाठी 60 व 40, तीन चाकी मोटर वाहने, रिक्षा यांच्यासाठी 60 व 40 किलोमीटर प्रतीतास अशी वेग मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील द्रुतगतीमार्ग व सहामार्गिका असणाऱ्या रस्त्यांवरील वेग मर्यादा पुढील प्रमाणे राहील. समतल व घाट भाग यांची मर्यादा अनुक्रमे दिली आहे. एम 1 श्रेणीतील वाहनांसाठी 80 व 40, एम-2 व एम - 3 श्रेणी, एन श्रेणीतील वाहने, दुचाकी, चार चाकी मोटर रिक्षा यांच्यासाठीची वेग मर्यादा 60 व 40 किलोमीटर प्रती तास आहे. तर तीन चाकी मोटर वाहने, रिक्षा यांच्यासाठी 50 व 40 कि.मी. प्रतीतास इतकी वेग मर्यादा निश्‍चित केली आहे.

दोन मार्गिका असणारे व विभाजक नसणारे राष्ट्रीय, राज्य महामार्ग व महापालिका क्षेत्रातील चार मार्गिका असणारे रस्ते याठिकाणी एम -1 श्रेणीतील वाहनांसाठी वेग मर्यादा 70 व 40 कि.मी. प्रतीतास, एम-2 व एम-3 श्रेणीतील, एन श्रेणीतील, दुचाकी व चार चाकी मोटर रिक्षा यांच्यासाठी वेग मर्यादा 60 व 40 कि.मी. प्रतीतास आहे. तर तीनचाकी मोटर वाहने, रिक्षा यांच्यासाठी ही मर्यादा 50 व 40 कि.मी. अशी आहे.

नगरपालिका क्षेत्रातील रस्ते व इतर रस्त्यांवर एम -1 श्रेणीतील वाहनांसाठीची वेग मर्यादा 60 व 40 आहे, तर एम - 2 व एम -3 श्रेणीतील वाहनांसाठी 50 व 30 किलोमीटर प्रतीतास, एन श्रेणीसाठी 40 व 30, दुचाकीसाठी 50 व 40, चारचाकी मोटर रिक्षा, तीन चाकी मोटर वाहने व रिक्षा यांच्यासाठी 40 व 30 किलोमीटर प्रतीतास याप्रमाणे वेग मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. 

वेग नियंत्रकाच्या अटी 
ज्या वळण रस्त्याची त्रिज्या 50 मीटर पेक्षा कमी आहे, अशा सर्व रस्त्यांवर वाहनांचा वेग ताशी 30 किलोमीटर निश्‍चित केला आहे. सर्व रस्त्यांवरील बोगद्यामध्ये वेग मर्यादा ताशी 80 किलोमिटर निश्‍चित आहे. नियम 118, केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये नमूद केल्यानुसार परिवहन संवर्गातील वाहनांना वेग नियंत्रकाच्या अटी लागू राहणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Speed Limit On Mumbai - Goa Highway