मिरजोळे गटात सेनेचा सुवर्णमध्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

रत्नागिरी - तालुक्‍यातील मिरजोळे गटाचा तिढा अखेर सुटला. वैभव पाटील यांच्या आईला पंचायत समिती गणातून उमेदवारी देऊन त्यांची समजूत घालण्यात आली. त्यामुळे महेश ऊर्फ बाबू म्हाप हेच मिरजोळे गटातील उमेदवार असतील. या गटातील दोन ग्रामपंचायती भाजपकडे, उर्वरित आठ ते दहा शिवसेनेकडे असल्याने शिवसेनेचे पारडे जड आहे; मात्र पाटील यांची नाराजी कायम राहिल्यास शिवसेनेला हा गट कठीण जाईल.

शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यात स्थानिक उमेदवार असावा, हा मुद्द कळीचा बनला आहे. त्यामुळे सेनेला उमेदवार निवड ही डोकेदुखी ठरली आहे. अनेक गट आणि गणांमध्ये हा तिढा आहे. मिरजोळे गटालादेखील विशेष महत्त्व होते. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून स्थानिक उमेदवार वैभव पाटील येथून इच्छुक होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पाटील आणि पंचायत समिती सभापती बाबू म्हापदेखील इच्छुक होते; मात्र स्थानिक मुद्द्यावर वैभव पाटील यांचे नाव वरच्या क्रमांकावर होते. त्यांना चांगला पाठिंबा आहे; मात्र पाटील आयत्या वेळी अन्य पक्षांच्या गोटात गेले व त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा विश्‍वास गमावला. प्रत्यक्षात राजकीय नव्हे, तर इतर मुद्द्यासाठी त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटल्याचे सांगण्यात आले. यामुळे पाटील यांचे नाव मागे पडून म्हाप यांना संधी मिळाली; मात्र बंडखोरीचा धोका होता.

मिरजोळे गणातून वैभव पाटील यांच्या आईला उमेदवारी देऊन गटात म्हाप यांना संधी देण्याचा सुवर्णमध्य निघाला. पाटील यांनी निवडणुकीत सेनेचेच काम करण्याची हमी दिली. या भागात भाजपचे विजय सालीम, योगेश पाटील यांचेही काम आहे. या भागात कुणबी समाज व त्यानंतर मराठा समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे या समाजाभोवती राजकारण फिरते.

मातोश्री उत्सुक नाहीत
वैभव पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या आईला गणातून उमेदवारी देण्याचा घाट शिवसेनेने घातला असला, तरी त्या निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे समजते. त्यात विभागप्रमुखांसह या भागातील अनेकांचा वैभव पाटील यांना ठाम पाठिंबा आहे. वैभव पाटील मन मोठे करून थांबले तरच सेनेला ही निवडणूक सोपी जाईल.

Web Title: sshivsena compramise in mirjole group