एसटीची रोकड हाताळणीचे 13 कोटी वाचणार ; बँकच घेऊन जाणार रोकड

मकरंद पटवर्धन
शनिवार, 14 एप्रिल 2018

एसटी महामंडळाची तिकीट विक्रीतून दररोज जमा होणारी रोख रक्कम स्थानिक पातळीवरील राष्ट्रीयीकृत बँक स्वतः आगारात येऊन घेऊन जाणार आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या दरवर्षी रोकड हाताळणीसाठी खर्च होणार्‍या सुमारे 13 कोटी रुपयांची बचत होणार आहे.

रत्नागिरी : एसटी महामंडळाची तिकीट विक्रीतून दररोज जमा होणारी रोख रक्कम स्थानिक पातळीवरील राष्ट्रीयीकृत बँक स्वतः आगारात येऊन घेऊन जाणार आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या दरवर्षी रोकड हाताळणीसाठी खर्च होणार्‍या सुमारे 13 कोटी रुपयांची बचत होणार आहे.

काही महिन्यांपूर्वी सोलापूर आगारात 15 लाख रुपयांची रोख रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी घेऊन जात असताना चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रकार घडला होता. या घटनेची परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी गंभीर दखल घेऊन रोख रक्कम भरण्याची जबाबदारी संबंधित बँकेवर सोपविण्याबाबत एसटी प्रशासनाला सूचना केली होती. रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

एसटी महामंडळाच्या 250 आगारात तिकीट विक्रीतून गोळा झालेली रोख रक्कम दररोज बँकेत महामंडळामार्फत जमा केली जाते. दरदिवशी सुमारे 15 कोटी रुपये रोख स्वरूपात विविध आगारात जमा होतात. ही रक्कम एसटीच्या बसेसद्वारे जवळच्या स्थानिक राष्ट्रीयीकृत बँकेत भरली जाते. मात्र, प्रत्येक आगारातून मोठ्या  प्रमाणात जमा होणार्‍या रोख रकमेची पुरेशी सुरक्षा व्यवस्था एसटीकडे उपलब्ध नसल्याने तसेच मागणी करूनही अपुर्‍या मनुष्यबळामुळे पोलिस प्रशासनाकडून असमर्थता दाखवली जात असल्याने या रकमेची चोरी होणे, दरोडा पडणे अशा घटना घडत असतात. 

हे सर्व थांबविण्यासाठी बँकेनेच आगारात येऊन रक्कम घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार भारतीय स्टेट बँकेने राज्यातील 250 आगार क्षेत्रातील रोख रक्कम घेऊन जाण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे ही रक्कम बँकेत जमा करणे, त्यासाठी लागणारी सुरक्षा व्यवस्था, बसची व्यवस्था या सर्वांवरील खर्चात बचत झाल्याने महामंडळाचे दरवर्षी तब्बल 13 कोटी रुपये वाचणार आहेत.

Web Title: ST Bus Service 13 Crore will be saved Cash Handling