एसटीचालकास मारणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

सावंतवाडी ः अपघाताच्या कारणावरून येथील एसटीचालक अकबर शेख मारहाणप्रकरणी संशयिताला आज अटक करण्यात आली. ही घटना काल (ता. 25) सायंकाळी सात वाजता येथील उपरलकर देवस्थानसमोर घडली होती.

सावंतवाडी ः अपघाताच्या कारणावरून येथील एसटीचालक अकबर शेख मारहाणप्रकरणी संशयिताला आज अटक करण्यात आली. ही घटना काल (ता. 25) सायंकाळी सात वाजता येथील उपरलकर देवस्थानसमोर घडली होती.
अपघात झाल्याच्या रागातून येथील एसटी आगाराचे चालक शेख यांना काल मारहाण करण्यात आली होती. मारहाणीत ते अत्यवस्थ झाले होते. त्यांना तत्काळ येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री उशिरा अभिषेक साईनाथ पोकळे (रा. गरड) याच्यावर सरकारी कामात अडथळा करणे आणि सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आज दुपारी अभिषेक याला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः येथील आगारात चालक म्हणून कार्यरत असलेले श्री. शेख सावंतवाडी-शिरशिंगे ही वस्तीची गाडी घेऊन माडखोलच्या दिशेने जात होते. समोरून येणाऱ्या अभिषेक याला वळणावर आपल्या गाडीवर ताबा मिळवता आला नाही आणि त्याची गाडी थेट एसटीला येऊन धडकली. समोरासमोर धडक झाल्याने यात अभिषेक याच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दरम्यान, या प्रकाराची विचारणा करण्यासाठी अभिषेक याने एसटीचालकाशी वाद घातला. अभिषेक व त्याच्या अन्य सहकाऱ्यांनी श्री. शेख यांना मारहाण केली. यात त्यांना दुखापत झाली. मारहाणीनंतर अभिषेक व त्याचे साथीदार तेथून पळून गेले. या प्रकाराची कल्पना श्री. शेख यांनी येथील आगारात फोनद्वारे वरिष्ठांना दिली. त्यानंतर वरिष्ठांनी तेथे धाव घेतली. काही वेळाने पोलिस तेथे दाखल झाले. काही काळ तेथे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
मारहाणीत श्री. शेख यांची प्रकृती खालावली. तशाच अवस्थेत त्यांना येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल रात्रीसाडे अकरा वाजता पोलिसांनी श्री. शेख यांची तक्रार घेतली. या तक्रारीत अभिषेक आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांनी आपल्याला मारहाण केली, असे त्यांनी म्हटले आहे. त्यानुसार अभिषेक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असे ठाणे अंमलदार पवार यांनी सांगितले. अपघातात अभिषेकला दुखापत झाली असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

अपघातावरून वाद
अपघातावरून हा प्रकार घडला आहे. मोटारीमध्ये असलेल्या अभिषेक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एसटीचालकाला मारहाण केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी त्याला अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता दर रविवारी दोन तास हजेरी लावणे, साक्षीदारांवर दबाव आणू नये आणि बाहेर जाऊ नये, अशा अटींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला, असे तपासिक अंमलदार मंगेश शिंगाडे यांनी सांगितले. याकामी ऍड. परीमल नाईक आणि ऍड. दिलीप नार्वेकर यांनी काम पाहिले. 

Web Title: ST drivers who are arrested to