एसटी कामगार संघटना १५ पासून आंदोलन करणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

कणकवली - एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू न केल्यास १५ मेपासून आंदोलन करणार आहेत. वेतन आयोग लागू होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. यामुळे शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असा इशारा मान्यताप्राप्त एस. टी. कामगार संघटनेने राज्य शासनाला दिला आहे.

कणकवली - एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू न केल्यास १५ मेपासून आंदोलन करणार आहेत. वेतन आयोग लागू होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. यामुळे शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असा इशारा मान्यताप्राप्त एस. टी. कामगार संघटनेने राज्य शासनाला दिला आहे.

एस. टी. कामगार संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन सांगली येथे झाले. यात १५ मेपासून बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती एस. टी. कामगार संघटनेचे विभागीय सचिव दिलीप साटम यांनी दिली. एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी दर चार वर्षांनी वेतन करार होतो. मागील वेतन कराराची मुदत मार्च २०१६ मध्येच संपुष्टात आली. त्यानंतर नवा करार होणे अपेक्षित होते; परंतु अद्यापही हा वेतन करार झालेला नाही. तसेच यापूर्वीचे वेतन करार करताना त्या त्या वेळच्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसारच वेतन करार केलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी एस. टी. कामगार संघटनेने ठामपणे केली आहे; परंतु याबाबत शासन चालढकलीचे धोरण राबवित आहे.

नव्या वेतन कराराबाबत गेले एक वर्षे एस. टी. महामंडळ आणि राज्य शासन यांच्यात चर्चा सुरू आहे. या बैठकांमध्ये मान्यताप्राप्त एस. टी. कामगार संघटनेनेही कामगारांची हिताची भूमिका वेळोवेळी मांडली आहे; परंतु वेतन कराराबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. एसटीच्या मान्यताप्राप्त संघटनेच्या सातवा वेतन आयोग आणि २५ टक्के हंगामी वाढ, या प्रमुख मागण्या आहेत; परंतु त्याकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता १५ मे ही वेतन आयोग लागू करण्याची अंतिम तारीख शासनाला दिली आहे. या मुदतीत सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू न झाल्यास राज्यातील एस. टी. कामगार एकाचवेळी आंदोलनात सहभागी होतील, असा इशाराही शासनाला देण्यात आल्याची माहिती विभागीय सचिव श्री. साटम यांनी दिली.

Web Title: ST trade union will conduct agitation from 15