Loksabha 2019 : असे पोहचले दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर कर्मचारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

विशेष म्हणजे वेड्यावाकड्या वाटांवरून, ओढ्यांमधून आणि प्रसंगी डोंगर चढून आपल्या इच्छित स्थळी पोचणाऱ्या या पथकांतील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान  होते. गावकऱ्यांनी देखील उत्स्फुर्तपणे त्यांचे स्वागत  केले. स्थानिक गावकरी, तलाठी, तसेच इतरांनी देखील या कर्मचाऱ्यांना सर्व साहित्य वाहून नेण्यासाठी मदत केली. 

नेरळ : मावळ लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानासाठी रायगड जिल्ह्यातून मतदान अधिकारी व कर्मचारी आपापल्या केंद्रांवर रुजू होत आहेत. मात्र, कर्जत तालुक्यातील ४ दूरवरील आणि दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर परिश्रमपूर्वक सर्व साहित्य घेऊन पोहचलेल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे स्वत: डोंगराळ भागात जाणाऱ्या या पथकांशी सातत्याने संवाद साधत होते.

विशेष म्हणजे वेड्यावाकड्या वाटांवरून, ओढ्यांमधून आणि प्रसंगी डोंगर चढून आपल्या इच्छित स्थळी पोचणाऱ्या या पथकांतील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान  होते. गावकऱ्यांनी देखील उत्स्फुर्तपणे त्यांचे स्वागत  केले. स्थानिक गावकरी, तलाठी, तसेच इतरांनी देखील या कर्मचाऱ्यांना सर्व साहित्य वाहून नेण्यासाठी मदत केली. 

रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत हे तीन तालुके मावळ मतदारसंघात येतात. यातील कर्जतमधील ५४ क्रमांकाचे केंद्र तुंगी येथे असून डोंगरमाथ्यावरील या गावात ३४४ मतदार आहेत. मध्यवर्ती मतदान केंद्रापासून हे अंतर २७ किमी असून केवळ कच्च्या रस्त्याने अथवा पायवाटेनेच या ठिकाणी पोहचता येते. २७४ मतदार संख्या असलेले पेठ या ठिकाणी देखील १०१ क्रमांकाचे मतदान केंद्र असून याठिकाणी जीपने जाता येते. मात्र रस्ता अवघड आहे. मध्यवर्ती मतदान केंद्रापासून हे अंतर २४ किमी आहे. १७७ मतदार असलेले ढाक या वाडीमध्ये १५६ क्रमांकाचे मतदान केंद्र असून मध्यवर्ती मतदान केंद्रापासून हे अंतर १० किमी आहे. येथेही अवघड अशा रस्त्याने जावे लागते. १०० मतदार असलेले कळकराई हे १७९ क्रमांकाचे मतदान केंद्र आहे. हे देखील केवळ छोट्या वाटेने जाण्यासारखे आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Staff reached the polling booths in remote areas