इकोसेन्सिटिव्ह न झाल्यास समृद्धीवर फिरणार नांगर

इकोसेन्सिटिव्ह न झाल्यास समृद्धीवर फिरणार नांगर

सावंतवाडी - दोडामार्ग तालुक्‍यातील पर्यावरणाबरोबरच येथील रहिवाशांचे जीवन पर्यावरणपूरक व समृद्ध राहावे, यासाठी आमची लढाई होती. लोकांसाठी लढा देऊनही निषेध मोर्चे निघत असतील तर ही लढाई कोणासाठी लढायची, अशी खंत पर्यावरण संरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे याचिकाकर्ते स्टॅलीन दयानंद आणि असनियेतील पर्यावरणवादी संदीप सावंत यांनी पत्रकातून व्यक्‍त केली आहे. 

इकोसेन्सिटिव्ह झाल्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर कोणताच फरक पडणार नाही; मात्र, यामुळे मायनिंगसारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागाच्या समृध्दीवर चालवला जाणारा नांगर कायमचा थांबणार होता, असेही पत्रकात म्‍हटले आहे.

दृष्टिक्षेपात...

 इकोसेन्सिटिव्ह झाल्यास काय होईल, काय होणार नाही.... 

  • काय होणार ः आता प्रमाणेच शासन परवानगीने वृक्षतोडीस परवानगी, जीर्ण झाडे विकायला परवानगी, घर, इंधन वापरासाठी लाकूड तोडीस परवानगी, खते वापरायला, बागायती वाढवायला, बागायतीसाठी साफसफाई बंधन नाही, पाणी वापरावर बंदी नाही, प्रक्रिया उद्योगाला परवानगी.
  •  काय होणार नाही ः शेकडो एकरवर कोळशासारख्या गोष्टीसाठी वृक्षतोडीला बंधन, खाणपट्टा पूर्णतः बंद, औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना बंदी, रेड झोनमधील प्रकल्पांना बंदी.

दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्‍यातील पर्यावरण रक्षणासाठी श्री स्टॅलीन यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर दोडामार्ग तालुक्‍यात तात्पुरती वृक्षतोडबंदी लागू केली आहे. यानंतर इकोसेन्सिटिव्ह विरोधात दोडामार्गमध्ये मोर्चा निघाला. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, झोळंबे मायनिंग जनसुनावणीत स्टॅलीन यांनी न्यायालयात म्हणणे मांडल्यानंतर स्थगिती मिळाली.

असनियेप्रमाणे झोळंबे, कोलझर, तळकट, उगाडे, आयी, माटणे, मांगेली, वझरे अशा अनेक गावांत मायनिंग प्रस्तावित आहे. दोडामार्ग तालुक्‍यात २२ ठिकाणी मायनिंगची मोठी लीज आहे. मात्र, आमच्या न्यायालयीन लढ्यामुळे हे मायनिंग गेली दहा वर्षे थांबले.

इकोसेन्सिटिव्हमध्ये दोडामार्ग तालुक्‍यातील ठराविक पॅच घेतले जाणार आहेत. या पॅचमध्येही बागायती करण्यावर, घरगुती वापरासाठी लाकूडतोडीवर, हॉटेल रिसॉर्ट उभारणीवर, पाणी वापरावर, खते वापरावर कोणतीच बंधने येणार नाहीत. मात्र, इकोसेन्सिटिव्ह न झाल्यास मायनिंगसह औष्णिक ऊर्जासारखे प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे असलेल्या शेतीबागायती व समृध्दीवर नांगर फिरवला जाणार आहे. इतके करूनही लोक आमचा निषेध करत असतील, आम्ही देशद्रोही असल्यासारखे आरोप करत असतील आणि खनिजासारखे प्रकल्प त्यांना हवे असतील तर या लढाईतून माघार घ्यायची आमची तयारी असल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com