मराठा क्रांतीची ही तर सुरवात

मराठा क्रांतीची ही तर सुरवात

सिंधुदुर्गनगरी : मराठे एकत्र येऊच शकत नाहीत, या समाजाला येथे लोटलेल्या मराठा महासागराने आज मूठमाती दिली; पण ही खरी सुरवात म्हणायला हवी. या महामोर्चाचा पुढच्या काळात सामाजिक, राजकीय क्षेत्रावरही सुप्त परिणाम दिसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मराठ्यांची ही ऊर्जा सिंधुदुर्गाच्या विकासाला लावली तर मात्र जिल्ह्याचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही.

मराठे एकत्रच येऊ शकत नाहीत, हा आत्तापर्यंतचा समज. राजकीय नेत्यांनी तोडाफोडीचे राजकारण करून वाडी-वाडीत गटबाजीला प्रोत्साहन देऊन या समजाला बळकटीच दिली. जिल्ह्यात जवळपास 70 टक्के लोकसंख्या मराठ्यांची आहे. सह्याद्रीच्या रांगामध्ये तर अनेक गावात केवळ मराठा समाजाचीच वस्ती आहे. सामाजिक व्यवस्थेवरही त्यांचा प्रभाव आहे. ते एकत्र आले तर गावाचा विकास चुटकीसरशी होऊ शकतो; पण ते कधी एकत्रच येऊ शकत नाहीत, असा समज गेल्या काही पिढ्यांपासून दृढ होत गेला.

राजकारणातील प्रभावासाठी गावोगाव विविध पक्षाचे गट तयार होऊ लागले. एका गटाने एका पक्षाला पाठिंबा दिला की दुसरा पक्ष गावात त्याच्या विरोधातला गट शोधू लागला. बहुसंख्य गावात दोन किंवा त्यापेक्षा जास्त गट सहज दिसतात. बहुसंख्य ठिकाणी त्याचे नेतृत्व आणि त्यातले सक्रिय सदस्य मराठा समाजामधलेच असल्याचे दिसते. त्यामुळे तळकोकणात तरी मराठ्यांना एकत्र आणणे कठीणच मानले जायचे.

परिस्थितीचे चटके बसू लागले की मात्र असे पिढ्यान्‌पिढ्या दागिन्यासारखे जपलेले समज, गैरसमजही गळून पडतात. त्यासाठी एखादे निमित्त हवे असते. मराठा क्रांती मूक मोर्चा हे याचे निमित्त ठरले. गेला महिनाभर या मोर्चासाठी जिल्ह्यातील गावोगाव मराठा समाजात एकोप्याचा उठाव दिसू लागला. यातूनच आजच्या मोर्चाला महासागराचे रूप आले. मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळपासून खारेपाटण ते बांद्यापर्यंत मराठा क्रांतीचा भगवा रंग चढला होता. नजर जाईल तिथे भगवे ध्वज मुख्यालयाच्या दिशेने झेपावत होते. हजारो वाहने, त्यावर "मराठा स्पीरीट' जागे झालेले मराठे दिसत होते. या गर्दीत मुलेही होती, तरुणही होते, आयुष्यभर शेतीत राबणारे शेतकरीही होते. परिस्थितीमुळे पिचलेले कष्टकरीही होते. जिल्ह्याच्या राजकारणात नेहमी मिरवणाऱ्या चेहऱ्यांपेक्षा हे चेहरे खूप वेगळे होते. हे खऱ्या अर्थाने तळागाळातील एकवटलेले मराठे होते.

खरे तर मोर्चाच्या संयोजकांनी तळागाळात जागृतीचे काम खूप चांगले केले; पण ते निमित्तमात्र ठरले. कारण गावोगावच्या मराठ्याने आधीच ठरवले होते की मोर्चाला जायचे, आपल्या कोंडमाऱ्याला वाट करून द्यायची आणि आपल्या एकोप्याचे दर्शन घडवायचे. येरव्ही एखाद्या पक्षाचा मेळावा यशस्वी करायचा झाला तर माणसे जमवणे खूप कठीण असते. गाड्यांची, जेवणखाणाची व्यवस्था करावी लागते; पण इथे पदरमोड करून मराठा एकवटला. तोही रेकॉर्ड ब्रेक संख्येने.

या मोर्चाचे पुढील काळात सामाजिक, राजकीय क्षेत्रावर सुप्त परिणाम दिसण्याची शक्‍यता आहे. मराठा एकत्र येऊ शकतो ही बाब या समाजाच्या दृष्टीने आत्मबल वाढवणारी ठरणार आहे. राजकीय क्षेत्रात याचा एकदम खूप मोठा परिणाम जाणवणार नसला तरी काही भागात मतांच्या गणितावर याचा प्रभाव पडू शकतो; पण जिल्ह्याच्या दृष्टीने तयार झालेल्या या ऊर्जेला चांगली दिशा देण्याची गरज आहे. यामुळेच मराठ्यांचा हा महामोर्चा म्हणजे क्रांतीचा शेवट नव्हे तर सुरवात मानून काम व्हायला हवे. जिल्ह्यात बहुसंख्य गावात आजही या समाजाचा लोकसंख्या, कष्ट, जमीनधारण क्षेत्र अशा कितीतरी पातळीवर वरचष्मा आहे. गावच्या रचनेतही त्यांचे महत्त्व अद्याप टिकून आहे. त्यामुळे या ऊर्जेचा वापर जिल्ह्याच्या विकासात केला तर सर्वांगीण प्रगती दूर नाही.
हा महामोर्चा सर्वसामान्य, भाबड्या मनाच्या मराठा समाजासाठी अनेक अपेक्षा घेऊन आला आहे. या अपेक्षापूर्तीची किमान सुरवात होणे आवश्‍यक आहे; अन्यथा अशी मोठी ऊर्जा पुन्हा गोळा करायला आणखी काही पिढ्या खर्ची पडाव्या लागण्याचीही भीती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com