नाणार प्रकल्प सुरू करा, कोकणवासियांच्या पोटावर पाय मारू नका, असे आवाहन कुणी केले शिवसेनेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

०

नाणार प्रकल्पासाठी केंद्र सरकारने  राज्याला आणखी दोन महिन्याची मुदत दिली आहे.

नाणार प्रकल्प सुरू करा, कोकणवासियांच्या पोटावर पाय मारू नका, असे आवाहन कुणी केले शिवसेनेला

रत्नागिरी : कोरोनामुळे  देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील रोजगार उद्‌ध्वस्त झाला आहे. मोठी कठीण परिस्थिती आहे. त्याचा फटका कोकणातून मुंबईत स्थिरावलेल्या चाकरमामान्यांनाही बसला आहे. अशावेळी कोकणात नियोजित नाणार ऱिफायनरी प्रकल्प होऊ देणे, हे इथल्या गोरगरीब जनतेसाठी अत्यावश्‍यक आहे. जे स्थानिक लोक जमीन देण्यास तयार आहेत, त्यांना सोबत घेऊन हा प्रकल्प करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन भाजपचे प्रदेश चिटणीस तथा दक्षिण रत्नागिरी प्रभारी प्रमोद जठार यांनी शिवसेनेला उद्देशून केले आहे. 

या प्रकल्पासाठी केंद्रातील भाजप सरकारने  राज्याला आणखी दोन महिन्याची मुदत दिली आहे. त्यामुळे शिवसेनेने आता स्थानिकांच्या पोटावर मारू नये, अशी भूमिकाही श्री. जठार यांनी मांडली आहे.

कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीसाठी श्री. जठार गुरूवारी रत्नागिरीत होते. बैठकीनंतर श्री. जठार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांचा मुद्दा प्रामुख्याने नाणार रिफायनरी प्रकल्प सुरू व्हावा, असाच होता. याच मुद्‌द्‌यावरून जठार यांनी शिवसेनेला साद घातली आहे.

यापूर्वी शिवसेनेच्या कडक विरोधामुळे प्रकल्प नाणारमध्ये होणार नाही. प्रकल्प रद्द करण्याचा अध्यादेशही निघाला. परंतु केंद्र सरकारने दोन महिन्यांची मुदत दिली असून कोरोना महामारीच्या संकटानंतर रोजगारासाठी प्रकल्प झाला पाहिजे, अशी भूमिका जठार यांनी मांडली.

अनेकांना रोजगार मिळणार

जठार म्हणाले, ``सध्या कोरोनामुळे बेरोजगारी वाढली आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांचे आयुष्य उद्‌ध्वस्त झाले आहे. अशावेळी कोकणी माणसासाठी नाणार रिफायनरी प्रकल्प मोठी भूमिका बजावणार आहे. या माध्यमातून लाखो युवकांना रोजगार निर्माण होणार आहे. त्याशिवाय आरोग्य, रस्ते, बंदरे, दळणवळण यामध्ये मोठी सुधारणा होणार आहे. कोकणी माणसाला चांगले दिवस येतील. त्यामुळे ज्यांना हा प्रकल्प हवा आहे, त्यांच्या जागा घेऊन हा प्रकल्प पुन्हा नाणार किंवा जिथे होईल तिथे तो प्रकल्प आणण्यासाठी शिवसेनेने आता आपली भूमिका बदलावी.``

शिवसेना काय प्रतिक्रिया देणार

नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा ठाम विऱोध आहे. त्यांच्यादृष्टीने हा विषय संपल्यात जमा आहे. आता भाजपने पुन्हा शांत झालेल्या पाण्यात खडा टाकला आहे. त्यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार याकडे आता कोकणवासियांचे लक्ष असणार आहे.

संपादन ः विजय वेदपाठक
 

loading image
go to top