मोठी कारवाई! सापळा रचला अन् अलगद अडकला, तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

निलेश मोरजकर
Tuesday, 8 September 2020

गोव्याहून आंबोलीच्या दिशेने बेकायदा गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती उत्पादन खात्याचे जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांना मिळाली होती.

बांदा (सिंधुुदुर्ग) - राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाने आज सकाळी सावंतवाडी-बेळगाव रस्त्यावर कारिवडे-बुर्डी पुलानजीक सापळा रचून बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर मोठी कारवाई केली. तब्बल 8 लाख 74 हजार 500 रुपये किमतीच्या उंची दारूसह एकूण 10 लाख 84 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी उमेद देवेंद्र साठे (वय 25, रा. बार्देश-म्हापसा-गोवा) याच्यावर अटकेची कारवाई केली. 

सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य उत्पादन खाते बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई करत नसल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्‍वभूमीवर आज उत्पादन शुल्क खात्याने मोठी कारवाई केली आहे. सविस्तर माहिती अशी, की गोव्याहून आंबोलीच्या दिशेने बेकायदा गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती उत्पादन खात्याचे जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांना मिळाली होती. त्यांनी आज सकाळीच निरीक्षक एस. के. दळवी, दुय्यम निरीक्षक यू. एस. थोरात, डी. एस. वायदंडे, जवान आर. डी. ठाकूर, दीपक वायदंडे, आर. एस. शिंदे यांच्यासह सापळा रचला होता. 

दरम्यान, 2 लाख रुपये किमतीची मोटार व संशयिताचा 10 हजाराचा मोबाईल, असा एकूण 10 लाख 84 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास निरीक्षक एस. के. दळवी करत आहेत. 

दारूसाठी खास कप्पा 
बांद्याहून आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीला (जीजे 25 ए 1122) तपासणीसाठी थांबविण्यात आले. मोटारीच्या मागील डिकीच्या खाली दारू वाहतुकीसाठी खास कप्पा तयार केला होता. हा कप्पा तोडला असता आतमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे बेकायदा खोके आढळले. पथकाने 8 लाख 74 हजार 500 रुपये किमतीच्या महागड्या 200 स्कॉचच्या बॉटल जप्त केल्या. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Excise Department officers seized the alcohol konkan sindhudurg