राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

सिंधुदुर्गनगरी - राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीने पुकारलेला 18 ते 20 जानेवारीचा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबई येथे झालेल्या चर्चेदरम्यान दिलेल्या आश्‍वासनानंतर स्थगित करण्यात तआला आहे, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष किसन धनराज व एस. एल. सपकाळ यांनी दिली. 

सिंधुदुर्गनगरी - राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीने पुकारलेला 18 ते 20 जानेवारीचा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबई येथे झालेल्या चर्चेदरम्यान दिलेल्या आश्‍वासनानंतर स्थगित करण्यात तआला आहे, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष किसन धनराज व एस. एल. सपकाळ यांनी दिली. 

राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध 31 मागण्यांसाठी राज्यस्तरीय समन्वय समितीने 18 ते 20 जानेवारी या दरम्यान संपाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने संपाची तयारी केली होती. या संपात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो कर्मचारी संपावर जाणार होते तर बुधवारी 18 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही निघणार होता. त्यादृष्टीने पोलिस प्रशासनाने बंदोबस्ताचीही तयारी ठेवली होती; मात्र सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना समन्वय समिती, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राजपत्रित अधिकारी महासंघ या संघटनांना संपाच्या पार्श्‍वभूमीवर 16 जानेवारीला रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वर्षा बंगल्यावर चर्चेसाठी पाचारण केले होते. या वेळी झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते र. ग. कर्णिक, राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दी. कुलते, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते योगीराज खोडे, गजानन शेटे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे नेते उमेशचंद्र चुलबुले, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे भाऊसाहेब पठाण हे उपस्थित होते. प्रलंबित प्रश्‍नांबाबत सकारात्मक चर्चा होऊन सातव्या वेतन आयोगासाठी सचिव के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्याबाबत लवकरच शासन आदेश निघणार आहे; तर उर्वरित मागण्यांबाबत मार्च 2017 च्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती देतानाच निवडणूक आचारसंहितेमुळे 18 ते 20 जानेवारी या कालावधीत 3 दिवसांचा राज्यव्यापी संप स्थगित ठेवावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार पुकारण्यात आलेला तीन दिवसांचा राज्यव्यापी संप स्थगित करण्यात आला आहे तर 18 जानेवारीचा मोर्चा रद्द करण्यात आला असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष तथा समन्वय समितीचे निमंत्रक धनराज व सपकाळ यांनी दिली.

Web Title: State government employees strike back