जयंत पाटलांकडुन तटकरेंची पाठराखण; प्रत्येकाने मर्यादा ओळखुन राहावे

सकाळ वृत्तसेवा | Sunday, 8 November 2020

आढाव्याचा अधिकार ;  खासदारांना कुठेही जाऊन आढावा घेण्याचा अधिकार आहे.

रत्नागिरी :  खासदारांना कुठेही जाऊन आढावा घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे खासदार तटकरे यांनी घेतलेल्या बैठकीबाबत आक्षेप घेण्याची गरज नाही. प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखुन राहिले पाहिजे. हक्कभंगापर्यंत जाण्याची गरज नव्हती. तटकरे राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांना मान-सन्मान राखलाच पहिजे, असे स्पष्ट मत व्यक्त करीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तटकरेंच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे दाखवुन दिले.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्यात काही दिवसांपासून बिनसले आहे. तटकरे खेड, दापोली तालुक्यात येऊन स्थानिक आमदार म्हणून कोणत्याही विकास कामांच्या उद्घाटनात मला निमंत्रित करत नाहीत, असा आक्षेप घेत तटकरेंच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला. यावरून सेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाताणी झाली होती. अजूनही हा विषय धुमसत आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले,  खासदार म्हणून सुनील तटकरे यांना आढावा बैठक घेण्याच अधिकार आहे. लोकांनी त्याना निवडुन दिले आहे. मी देखील कधी खासदारांनी आढावा घेतल्यास त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे हा विषय ताणण्याची गरज नाही. आपल्या मर्यादा आपण ओळखुन राहिले पाहिजे. बैठका घेणे वावगे नाही. सुनील तटकरे यांचा मान सन्मान राखणे आवश्यक आहे.

जनतेच्या मताचा आदर करून निर्णय

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत अनेक शंका स्थानिकांच्या मनात आहेत. अणुऊर्जा प्रकल्प आणि रिफायनरीमधील अंतर, प्रदुषण, मच्छीमारीवर होणारा परिणाम आदीमुळे स्थनिकांचा विरोध आहे. जनतेच्या मताचा आदर करून यावर निर्णय घेऊ. मात्र प्रकल्प चांगला असला तर त्याचे स्वागत केले पाहिजे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
 

निर्णय अनपेक्षित
मराठा आरक्षण सुप्रिम कोर्टात केस आहे. तीन न्यायमुर्तीच्या खंडपीठाने घेतलेला निर्णय अनपेक्षित होता. मात्र त्याचा आम्हाला आदर आहे. यामध्ये 20-21 मधील भरतीला स्थगिती, शैक्षणिक प्रवेशाला स्थगिती दिली. आम्ही ही मागणी केली नव्हती. मात्र राज्य शासन पुन्हा आपली बाजू मांडेल. एक महिन्याचा कालावधी दिला आहे. आरक्षण टिकावे, यासाठी आमचा प्रयत्न असुन नक्कीच आमच्या बाजूने निर्णय होईल, असा विश्‍वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

संपादन - अर्चना बनगे