सिंधुदुर्गात 13 ते 17 जुन दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून खबरदारीच्या सुचना देण्यात आली आहे. 

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून खबरदारीच्या सुचना देण्यात आली आहे. 

दरम्यान पावसाने जोर धरल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा प्रशासननाने दिला आहे. कोकण किनारपट्टीला फटका नसला तरी समुद्र मात्र खवळलेला पहायला मिळणार आहे. आतापर्यंत सरासरी 36.12  मि. मी. पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे याकाळात दरड कोसळण्याच्या घटना आंबोली घाटात घडतात. 

घाटात दगड पडण्याच्या घटना विचारात घेऊन बांधकाम विभागाने या बाबत तात्काळ योग्य ते नियोजन करून उपाय योजना करावी. अन्यथा त्याचा फटका पर्यटनावर बसू शकतो

-  आत्माराम पालयेकर, माजी आरोग्य सभापती

आंबोली घाटात ठिकठिकाणी दगड रस्त्यावर येण्याच्या घटना कालपासून घडल्या आहेत. काही पर्यटकांच्या गाडीवरही छोटे दगड पडण्याच्या घटना काल रात्री घडल्या. पहिल्याच पावसात ही परिस्थिती उद्भवल्याने आंबोलीच्या वर्षा पर्यटनाला दरडींचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात चार महिन्यात लाखो पर्यटक आंबोली वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. मात्र दरडींच्या भीतीने पर्यटन व्यवसायावर देखील याचा विपरीत परिणाम होणार आहे. पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून आंबोली घाटाची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी घाट सुस्थितीत असल्याचे बांधकाम खात्याकडून सांगण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसात डोंगरातून दगड रस्त्यावर आल्याने बांधकाम खात्याचा घाट सुरक्षित असल्याचा दावा फोल ठरला आहे. सावंतवाडी, गोव्यातून बेळगाव, कोल्हापूर येथे जाण्यासाठी आंबोली घाट हा एकमेव मार्ग आहे. मात्र हा घाटच असुरक्षित असल्याने पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stone Collapse incident in Amboli Ghat region