रेती उत्खननाने इन्सुलीवासीय आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

बांदा - इन्सुली येथील तेरेखोल नदीच्या पात्रात सुरू असलेले रेती व गोटे यांचे उत्खनन तुम्ही तत्काळ थांबवा; अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर पडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा इन्सुली ग्रामस्थांनी आज घेतला. तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात, तर आपण उत्खननाला परवानगी कशी दिली, असा संतप्त सवाल या वेळी ग्रामस्थांनी केला.

बांदा - इन्सुली येथील तेरेखोल नदीच्या पात्रात सुरू असलेले रेती व गोटे यांचे उत्खनन तुम्ही तत्काळ थांबवा; अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर पडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा इन्सुली ग्रामस्थांनी आज घेतला. तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात, तर आपण उत्खननाला परवानगी कशी दिली, असा संतप्त सवाल या वेळी ग्रामस्थांनी केला.

आपण परवानगी दिली नसून असा कोणताही ठराव मासिक सभेत किंवा ग्रामसभेत झाला नाही; मात्र परस्पर सरपंच आणि ग्रामसेवकांनी या कामाला ना हरकत दाखला दिला असल्याचा आरोप या वेळी उपसरपंच कृष्णा सावंत, सदस्य सदा राणे आणि तपस्वी मोरजकर यांनी केला. कोणत्याही प्रकारे आम्ही हे उत्खनन करावयास देणार नसल्याचे या वेळी उपस्थितांनी सांगितले. ज्यांनी इतर सदस्यांच्या नजरेआडून हे कृत्य केले आहे, त्यांचा चांगला समाचार घेणार असल्याचेही उपस्थित सदस्यांनी सांगितले. संबंधित काम दोन दिवस बंद करून मासिक सभेनंतर तुम्हाला निर्णय देऊ, असे ठेकेदाराला सांगितले.

गेले दोन दिवस इन्सुली तेरेखोल नदीच्या पात्रात उत्खनन चालू आहे. ही वाहतूक ग्रामस्थांनी काल (ता. २३) रोखली आणि ठेकेदाराला आम्ही ग्रामपंचायतीशी बोलून नंतर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून काम सुरू करायचे, की बंद हा निर्णय घेण्याचे ग्रामस्थांनी ठेकेदाराला सांगितले. यावर ठेकेदाराने लगेच काम बंद करत जर ग्रामस्थ सांगत असतील तर आम्ही तुमच्या विरोधात जाणार नसल्याचे सांगत ग्रामस्थांना सहकार्य केले.

याच पार्श्‍वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायत कार्यालयात धडक मारली. त्यांनी ग्रामविकास अधिकारी सी. व्ही. राऊळ आणि उपसरपंचांना घेराओ घातला. या वेळी ग्रामस्थांनी तुम्ही गावासाठी काम करता, की कोणासाठी असा प्रश्‍न विचारला. ज्या ठिकाणी हे काम चालू आहे, त्या ठिकाणी नदीने वळसा घेतला आहे. त्याचबरोबर येथील रहिवाशांना नदीवर अनेक कामासाठी वारंवार जावे लागते. काही वर्षांपूर्वी याच नदीच्या पात्रात एका ठेकेदाराकडून वाळू उत्खनन केल्यामुळे मोठा चर पडला व त्या चरात कपडे धुण्यासाठी गेलेली महिला पडली होती. या ठिकाणी एक ग्रामस्थ गुरांना पाण्यासाठी घेऊन गेला असता त्याने त्या महिलेला वाचविले. या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही आपल्याला विनंती करतो, की उत्खनन थांबवा.

या नदीच्या पात्रालगत आमच्या बागायती अवलंबून असून आतील वाळू (गोटे) काढल्यामुळे नदीच्या पात्राचे पाणी लगतच्या बागायतीत घुसून बागायती गिळंकृत केल्या जातात. त्यामुळे आमच्या बागयतीसुद्धा या कामामुळे धोक्‍यात आहेत. शेकडो गुंठे जमीन ही वाळू काढल्यामुळे नदी गिळंकृत करत आहे, असे उपस्थितांनी स्पष्ट केले. तुम्ही नदीतील वाळू काढण्यासाठी परवानगी देत असाल तर शेतकऱ्यांनी काय करायचे? बागायतीचे काय, अशा अनेक प्रश्‍नांचा भडिमार केला.

यावर उपसरपंच सावंत यांनी आम्ही मासिक सभेत अशी कोणतीच परवानगी दिली नसल्याचे सांगितले. यावर ग्रामविकास अधिकारी राऊळ यांनी या प्रकरणाचा ठराव मासिक सभेत घेण्यात आल्याचे सांगितले. यावर श्री. सावंत यांनी तुम्ही खोटे बोलू नका, गावासमोर खोटे बोलला तर याद राखा, असे खडे बोल सुनावले. यावर ग्रामपंचायत सदस्य सदा राणे ग्रामविकास अधिकारी राऊळ यांच्यावर संतापले. तुम्ही सरपंचांना हाताशी धरून असा मनमानी कारभार करीत असाल तर याद राखा. असली कामे करायची असतील तर आम्ही राजीनामा देतो, गावाला उत्तर तुम्हाला द्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी जर आमच्या गावातील लोकप्रतिनिधीला विश्‍वासात न घेता कोणतेच काम तुम्ही करत असाल तर असले अधिकारी आम्हाला नको, असा पवित्रा ग्रमस्थांनी घेतला. यावर आपण तोडगा काढूया, असे उपसरपंचांनी सांगितले; मात्र सरपंच उपस्थित नसल्याने तोडगा काढायला अडचण येत असल्याचे ग्रामविकास अधिकारी राऊळ यांनी सांगितले. जोपर्यंत सरपंच येत नाहीत तोपर्यंत काम बंद करण्याची मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली. यावर ठेकेदाराला दोन दिवस काम बंद ठेवून सरपंचांनी तुम्हाला दाखला दिला आहे. सरपंच आले, की आपण काय ते बघू असे उपसरपंचांनी ठेकेदाराला सांगितले. ठेकेदाराने ते मान्यही केले.

या वेळी चेअरमन काका चराटकर, दिलीप गावडे, बबन दळवी, प्रणय ठाकूर, संदीप दळवी, अमित गरूड, नवज्योत गावडे, गुरुनाथ मांजरेकर, सूर्यकांत दळवी, देवेश मोर्ये, श्‍याम कुडव, बाळा बागवे, सूर्या पालव, सिद्धेश गावडे, अक्षय गावडे उपस्थित होते.

सरपंच नसल्याने गैरसोय
गेले काही दिवस गावचे सरपंच उत्कर्षा हळदणकर गावात नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. सुमारे सहा किलोमीटर क्षेत्राचा असलेला गाव अनेक जण पायी चालत आपल्या वैयक्तिक कामासाठी ग्रामपंचायत कार्यालयात येतात; मात्र सरपंच नसल्याने त्यांचा वेळ वाया जातो. कोणताच चार्ज त्यांनी उपसरपंचांकडे दिलेला नाही.

ग्रामविकास अधिकाऱ्यांना सुनावले
या वेळी उपसरपंच कृष्णा सावंत, ग्रामपंचायत सदस्य सदा राणे, तपस्वी मोरजकर यांनी ग्रामविकास अधिकारी आणि लिपिक यांना चांगले सुनावले. गावच्या कोणासही हानी पोचत असेल तर असे कागद रंगविण्यासाठी तुम्ही कोणाच्या दबावाखाली काम करू नका, असे सांगितले. असे केल्यास आम्ही तुमचीसुद्धा तक्रार करू, असे सांगितले. या वेळी ग्रामस्थांनी काम बंद करण्यासाठीचे निवेदन उपसरपंचांकडे दिले.

Web Title: Stop the excavation immediately