नोटीसा मिळेपर्यंत वागदेत काम बंद

नोटीसा मिळेपर्यंत वागदेत काम बंद

कणकवली -  महामार्गाच्या चौपदरीकरणात गडनदी पुलापासून ओसरगावपर्यंतच्या वागदे गावातील 74 खातेदारांना भूसंपादन आणि मोबदल्याबाबत नोटीसा मिळेपर्यंत तेथील चौपदरीकरणाचे काम थांबवावे, असा निर्णय आजच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. प्रांताधिकारी निता शिंदे यांच्या दालनात आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज ही बैठक झाली.
मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वागदे ग्रामस्थांनी शनिवारी (ता.9) रोखले होते.

गावातील प्रकल्पग्रस्तांना कोणत्याही नोटीसा न देता रस्त्याचे काम जबरदस्तीने सुरू करण्यात आले. काही ठिकाणी सार्वजनिक वाटा बंद करण्यात आल्या. यामुळे स्थानिक ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. तसेच श्री. परब यांच्या घराच्या भिंतीपर्यंत माती टाकून रस्ता तयार करण्यात आल्याने त्यांच्या घराला धोका निर्माण झाला होता. यामुळे हे काम बंद पाडले होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक झाली. यावेळी महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर उपस्थित होते.

वागदे सरपंच पूजा घाडीगांवकर यांनी मुद्दा मांडला की, 16 ऑगस्टच्या ग्रामसभेत वागदे गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या पाणी निचरा मोऱ्या, बस थांबे, अंडरपास रस्ते याची माहिती दिली जाईल, असे बिल्डकॉनच्या इंजिनियरनी सांगितले होते; मात्र ग्रामस्थांना कोणतीही माहिती न देता रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. याबाबत वागदे गावातील अडचणी आणि भविष्यातील धोके या बैठकीत मांडण्यात आले.

त्यानंतर टेंबवाडीकडे जाणारा रस्ता, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, असरोंडी फाटा या महत्वाच्या रस्त्यांना जोडण्यासाठी 50 मीटरपर्यंत जोडरस्त्याचे डांबरीकरण करून दिले जाईल तसेच वागदे गावातील एसटी बसथांबे पूर्वीप्रमाणेच निश्‍चित केले जातील, असे आश्‍वासन श्री. शेडेकर यांनी दिले.

यावेळी रूपेश आमडोसकर, वास्तुविशारद संदीप वालावलकर, वृक्षवल्लीचे विजय सावंत, ललीत घाडीगांवकर, शिरीष घाडीगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

काम रेटून नेण्याचा प्रयत्न
ठेकेदार कंपनीकडून बळजबरी महामार्गाच्या चौपदरीकरणाला ठेकेदार कंपनी प्रकल्पग्रस्तांवर बळजबरी करून काम रेटून नेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप वागदे सरपंच घाडीगावकर यांनी केला. ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती न देता सार्वजनिक रस्ते तोडून टाकण्यात आले आहेत यामुळे गावातील शाळकरी मुले जनावरे शेतकरी यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com