मालवण - भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या चक्रीवादळाच्या इशाऱ्यानुसार जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात आज अमावस्येच्या उधाणाचा जोर वाढल्याचे दिसले. समुद्राच्या अजस्र लाटा किनाऱ्यावर धडकू लागल्याने आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मच्छीमारांची एकच तारांबळ उडाल्याचे चित्र किनारपट्टी भागात दिसले. खोल समुद्रात वादळसदृश परिस्थिती असल्याने मासेमारीस गेलेल्या सर्व नौका मालवण तसेच देवगड येथील सुरक्षित बंदरात माघारी परतल्या होत्या. चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्याच्या किनारपट्टीवर जाणवला.
भारतीय हवामान खात्याने खोल समुद्रात चक्रीवादळाची शक्यता वर्तविली होती. यात १२ तारखेपर्यंत खोल समुद्रात मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचनाही दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच येथील किनारपट्टीवर समुद्री लाटांचा जोर वाढला. अजस्र लाटांचा मारा किनाऱ्यावर होऊ लागल्याने किनाऱ्यावर उभ्या करून ठेवलेल्या मच्छीमारी नौका सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मच्छीमारांची मोठी तारांबळ उडाली. खोल समुद्रात वादळ झाल्याने पहाटे तसेच सकाळच्या सत्रात मासेमारीस गेलेल्या मच्छीमारी नौका किनाऱ्यावर परतत होत्या. पाण्याचा प्रवाह वाढल्याने समुद्राने रौद्ररूप धारण केले होते. मोठ्या लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या.
दांडी किनाऱ्यावर मासेमारी गेलेल्या काही पाती माघारी परतत असताना किनाऱ्यालगतच काही अंतरावर लाटांचा मारा त्यांच्यावर झाला. यात एका पातीवरील दोन मच्छीमार पाण्यात फेकले गेले तर एकाने समुद्रात उडी मारली; मात्र किनाऱ्यालगतच ही घटना घडल्याने यात कोणालाही दुखापत झाली नाही.
धोक्याचा इशारा
विजेच्या लखलखाटासह काल (ता.९) रात्री कोसळलेल्या पावसाचा जोर कमी झाला तरी समुद्रात चक्रीवादळसदृश स्थिती असल्याने मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले. अमावस्येचे उधाण असल्याने किनाऱ्यालगत लाटांचा सुरू असलेला मारा दुपारनंतर काहीसा ओसल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.