सिंधुदुर्ग : करूळला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

करूळ भोयडेवाडीला गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. अचानक आलेल्या वादळामुळे करूळवासीय चक्रावून गेले. दहा ते पंधरा मिनिटे वादळ सुरू होते. यात शेकडो झाडे उन्मळून पडली. त्यातील काही झाडे पाच इमारतींवर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

वैभववाडी - करूळ भोयडेवाडीला गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. अचानक आलेल्या वादळामुळे करूळवासीय चक्रावून गेले. दहा ते पंधरा मिनिटे वादळ सुरू होते. यात शेकडो झाडे उन्मळून पडली. त्यातील काही झाडे पाच इमारतींवर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. करूळ परिसरातील भातशेतीलादेखील वादळाचा फटका बसला असून शेती भुईसपाट झाली आहे. 

जिल्ह्यात काही भागात सकाळच्या सत्रात कडक ऊन आणि सायंकाळी उशिरा विजांच्या कडकडाटासह पाऊस असे समीकरणच झाले आहे. गुरुवारी सायंकाळीसुद्धा जिल्ह्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर अधिक होता. वैभववाडी आणि कणकवली तालुक्‍यातील काही भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. 

दरम्यान, करूळ भोयडेवाडी येथे वादळाचा तडाखा बसला. दहा ते पंधरा मिनिटांत परिसरातील शेकडो झाडे उन्मळून पडली. विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळ एकाच वेळी आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. वादळामुळे उन्मळून पडलेली झाडे काही घरांवर कोसळली. रघुनाथ धोंडू माळकर, काशिनाथ माळकर, विश्‍वनाथ राजाराम राशिवटे, हिराचंद विष्णू माळकर यांच्या घरांवर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले. रत्नकांत सुरबा राशिवटे यांच्या गोठ्याचे नुकसान झाले. 

करूळ परिसरात मोठ्या प्रमाणात भातशेती कापणीला आली आहे. कालच्या वादळामुळे बहुतांश शेती भुईसपाट झाली आहे. भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सध्या सतत पडणारा पाऊस आणि वादळी वारा यामुळे नुकसानसत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी कणकवली तालुक्‍यातील शिडवणे, साळिस्ते परिसराला वादळाचा तडाखा बसला होता. त्या परिसरातील घरे, शाळांच्या छपरांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय या भागातील भातशेतीचेही नुकसान झाले आहे. 

सलग सात दिवस पाऊस 
वैभववाडी, कणकवली तालुक्‍यातील काही गावांमध्ये सलग सहा ते सात दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stormy Rains in Karul in Sindhudurg