Photo : कथा सुपारीची : जगातील सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या देशातील बागायदार अडचणीत...

मयूरेश पाटणकर
गुरुवार, 28 मे 2020

लॉकडाऊनमुळे मांडला  झालाच नाही...

 

गुहागर  (रत्नागिरी) :  जगातील सुपारीच्या एकूण उत्पन्नापैकी 57 टक्के उत्पन्न भारतात होते. तसेच जगातील 58 देशांमध्ये भारतातून सुपारीची निर्यात केली जाते. महाराष्ट्रातील कोकण विभागात सुपारीचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. मात्र कोकणातील सुपारी बागायतदार लॉकडाऊन मुळे मांडला नसल्याने यावर्षी अडचणीत सापडला आहे. तसेच विविध कारणांनी कोकणातील सुपारी उत्पादनही घटत आहे.

वर्षातून एकदाच कमी उत्पादन खर्चात दामदुप्पट उत्पन्न मिळविणार नगदी पिक म्हणून सुपारीकडे पाहिले जाते. जगात केवळ 12 देशात सुपारीचे उत्पादन होते. भारतामध्ये मुबलक पाणी असणाऱ्या राज्यात सुपारीची लागवड केली जाते. देशात कर्नाटक, केरळ, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, मिझोराम, तामिळनाडू, त्रिपुरा, अंदमान निकोबार द्विपसमुह आणि महाराष्ट्र या राज्यात सुपारीचे उत्पन्न घेतले जाते.सर्वाधिक उत्पादन कर्नाटक, केरळ, आसाम, मेघालय या राज्यात होते. सुपारी उत्पादक राज्यात महाराष्ट्राचा क्रमांक सर्वात शेवट लागतो. येथील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या तीन जिल्ह्यातच सुपारीचे उत्पन्न घेतले जाते.

 हेही वाचा- कोल्हापूर जिल्ह्यात 'या' ठिकाणी सापडले गुप्त धनाचे मडके... -

 कसे होते सुपारी उत्पादन

लागवडीनंतर  5 ते 7 वर्षांनी उत्पन्न मिळण्यास सुरवात होते. पावसाळ्यात सुपारी मोहरते. त्यावेळी बुरशी अव अन्य रोगांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून औषध फवारणी केली जाते. अधिक उत्पन्न मिळण्यासाठी, पोफळीचे झाड उत्तम व्हावे म्हणून दर दोन महिन्यांनी पुरक खते दिली जातात. अन्य नगदी पिकांपेक्षा कमी खर्चात अधिक उत्पन्न  सुपारीपासून मिळते. फेब्रुवारी महिन्यापासून पोफळ पिकायला सुरवात होते. त्यामुळे हिरव्यागार बागेत केशरी रंगाची छटा उमटते.  झाडावरुन पोफळाची शिंपूट तोडून 50 दिवस उन्हात वाळविण्यासाठी घालतात. पोफळाची साल सोलून सुपारी वाळवली तर 40 दिवसात वाळते. वाळलेले पोफळ फोडून त्यातून सुपारी बाजुला केली जाते. ही वेळखाऊ प्रक्रिया एप्रिलपर्यंत सुरु असते. पोफळातूप सुपारी बाहेर काढल्यानंतर स्पेशल मोहरा, मोहरा, सुपारी, वचरास, झीणी या मुख्य प्रकारात वर्गवारी केली जाते. त्यानंतर या  ५ प्रकारातील फटोर (तडा गेलेली ), पासोडा (सुपारी सोलताना पांढरे साल चिकटेली) आणि खोका (खराब, काळी, कुजकी) असे उपप्रकारांची सुपारी निवडून बाजुला काढली जाते. ही वर्गवारी करण्याकरीता वैशिष्ट्यपूर्ण चाळणींचा वापर केला जातो.

 

हेही वाचा- सावरकरांकडून हातगाडीने स्वदेशी मालाची विक्री

 सुपारीची मुख्य बाजारपेठ गुजराथमध्ये

महाराष्ट्रातील सुपारीचे उत्पादन वाशी मार्केटमधील व्यापारी खरेदी करतात. वर्गवारी करुन आलेल्या सुपारीमध्ये स्पेशल मोहरा, मोहरा, सुपारी या तीन प्रकारांना सर्वाधिक भाव मिळतो. वाशी मार्केटमधील व्यापारी या सुपारीला सल्फरची धुरी देतात. त्यानंतर हवाबंद गोडावूनमध्ये सुपारी साठवली जाते. ही सर्व सुपारी गुजराथ राज्यातील सुरत, राजकोट, अहमदाबाद, कच्छ येथील मुख्य व्यापाऱ्यांकडे पाठवून देतात.

 दर ठरविणारा मांडला

दरवर्षी गुढीपाडव्याला वाशी मार्केटमध्ये सुपारीचा मांडला (लिलाव) होतो. सुपारीच्या प्रत्येक वर्गवारीसाठी स्वतंत्र मांडला होतो. मांडल्यामध्ये ज्या दराने सुपारी खरेदी केली जाते तोच दर त्या हंगामासाठी प्रमाणित केला जातो.  यावर्षी गुढीपाडव्यापूर्वी  देशात लॉकडाऊन जाहीर झाला. देशातील व्यापार, दळणवळण, उद्योग सर्व काही ठप्प झाले. त्यामुळे वाशी मार्केटमध्ये सुपारीच्या मुहूर्ताचा मांडला झालाच नाही. त्यामुळे बागायदारांकडे विक्रीस योग्य सुपारी पडून आहे. सर्वजण लॉकडाऊन उठेल या आशेवर आहेत. दमट हवेत कितीही उत्तम पॅकिंग केले तरी सुपारीला भुंगा लागतो. आतून बुरशी येवून सुपारी तांबूस काळी पडते. ही सुपारी नंतर विकली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मांडला झाला नाही तर सुपारी बागायदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.

हेही वाचा- सिंधुदुर्गाला बसला दूसरा धक्का : आणखी पाच रुग्ण पॉझिटिव्ह

 

कोकणातील सुपारी उत्पादन घटतयं

 

देशांतर्गत सुपारी उत्पादनात कोकणचा वाटा अत्यल्प आहे. छोट्या जमिनीत अधिक हिस्सेदार, यांत्रिकीकरणाची कमी आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या जातींची उपलब्धता, मजुरांची कमी, बदलते वातावरण या कारणांमुळे कोकणातील सुपारीचे उत्पादन घटत आहे. 

कोकणातील भौगोलिक रचनेत नारळ, सुपारीच्या बहुतांशी बागा घराशेजारी आहेत. ही सर्व घरे आणि बागा असलेली जमिन सामायिक आहे. यातील हिस्सेदारांपैकी एकजण गावात थांबला तर अन्य भावंडे मुंबई, पुणे, अन्य शहरे आणि देशात नोकरी उद्योगाच्या निमित्ताने स्थायिक झाले. परगावात, परदेशात केलेले हे सगेसोयरे उन्हाळ्याच्या सुट्टीत मजा करण्यासाठी येत असतं. तेथे हिश्शाची भाषा नव्हती. मात्र गेल्या काही वर्षात कोकणातील जमीनींचा भाव वधारला. त्यातून हिस्सेदार, सहहिस्सेदारांना पैसे मिळू लागल्यावर सामायिक जमीनीतील उत्पन्नावरकडेही या सर्वांचे लक्ष वेधले. गावात रहाणाऱ्यांनी घर, शेती आदी व्यवहारांचा लेखाजोखा ठेवला नाही. परिणामी सामायिक उत्पन्न हा वादाचा विषय बनल्याने आंबा, सुपारी, नारळ, काजू आदी नगदी उत्पादकांच्या वृध्दीकडे स्थानिक रहिवाशी दुर्लक्ष करु लागले.

हेही वाचा- कहर सुरूच ; कोल्हापूर जिल्ह्यात आणखी 25 कोरोना पाॅझिटिव्ह... -

नोकऱ्यांसाठी गावाकडील मंडळी शहरांकडे वळु लागल्याने स्थानिक पातळीवरील कामगारांची संख्या कमी झाली. त्याचबरोबर कोकणातील बागायतदार मंडळीही उत्पन्नासाठी शेती उद्योगाशिवायाचे पर्याय निवडू लागली. बागायदारांची मुले बागायतीला भविष्य न ठरवता अभियांत्रिकी, वैद्यकिय क्षेत्रांचे पर्याय निवडू लागली. त्यामुळे कोकणातील कृषी उत्पन्नाचा विकास खुंटला आहे. सुपारी उत्पादक अन्य राज्यात यांत्रिकीकरण झाले आहे. बागेतील सुपारी काढण्यापासून ते पोफळातील सुपारी सोलण्यापर्यंतची यंत्रे आज देशात उपलब्ध आहेत. कमी उंचीच्या, अधिक उत्पन्न देणाऱ्या सुपारीच्या जातीही विकसीत झाल्या आहेत. मात्र त्याकडे कोकणातील बागायदारांनी दुर्दैवाने लक्ष दिलेले नाही.

आज द्राक्ष उत्पादकांची मुले द्राक्ष बागायती करतात. ही मंडळी अभ्यास करतात, संशोधन करतात, नवीन तंत्रज्ञान आणतात.  त्यांचे कार्य समजुन घेवून केवळ सुपारीसाठीच नव्हे तर कोकणातील आंबा, काजू, नारळ आदी उत्पादकांनी संघटीत होवून विकासाची पॉलिसी ठरवली पाहिजे. हे शक्य झाले तरच कोकणातील नगदी पिके वाचतील.

-    डॉ. अनिल जोशी, कृषी अभ्यासक

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of the betel nut in kokan