सिंधुदुर्गातील किर्लोस कृषी विज्ञान केंद्रात फुलतेय स्ट्रॉबेरी 

strawberries cultiation at Kirlos Agricultural Science Center in Sindhudurg
strawberries cultiation at Kirlos Agricultural Science Center in Sindhudurg

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - आवळ्यांच्या झाडांमध्ये आंतरपिक म्हणून स्ट्रॉबेरी लागवडीचा कृषी विज्ञान केंद्र किर्लोसने केलेला प्रयोग प्राथमिक टप्प्यात यशस्वी झाला आहे. या रोपांना आता फळधारणा झाली असून फळांचे वजन 12 ग्रॅमपर्यंत आहे. कोकणातील कृषीक्षेत्राच्या दृष्टीने हा प्रयोग अतिशय महत्वाचा मानला जात आहे. किर्लोस केंद्राच्या प्रक्षेत्रावरील लागवडीला भेट देण्यासाठी जिल्ह्यातून अनेक शेतकरी येत आहेत. 

आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारीसह विविध फळपिके कोकणची ओळख मानली जाते. यासोबतच भात, नाचणी आदी पिके जिल्ह्यात घेतली जातात; परंतु नियोजनबध्द शेती केली तर जिल्ह्यातील जमीन, पाणी आणि हवामान अनेक पीकांसाठी पोषक आहे. हे कृषी विज्ञान केंद्र किर्लोसने सिध्द करून दाखविले आहे.

गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यात विविध संस्था आणि काही शेतकरी आपआपल्या शेतात विविध पिकांची लागवड करून यशस्वी होताना दिसत आहेत. आता देखील कृषी विज्ञान केंद्र किर्लोसने आपल्या प्रक्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून ही लागवड केली होती. कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर सध्या आवळा लागवड केलेली असून ही झाडे सध्या चांगले उत्पादन देत आहेत.

पसरलेल्या झाडांच्यामध्ये शिल्लक राहिलेल्या जागेत संस्थेचे अध्यक्ष श्री. सावंत यांच्या संकल्पनेतून आतंरपिक स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिलाच प्रयत्न असल्यामुळे दोन गुंठ्यात हा प्रयोग करण्याचे निश्‍चित करण्यात आले. 400 रोपे लागवड करता येतील अशा पध्दतीने गादीवाफे तयार करण्यात आले. कायम सेंद्रीय शेतीवर भर देणाऱ्या या संस्थेने स्ट्रॉबेरी देखील त्याच पध्दतीने लागवड करण्याचा निर्धार केला.

लागवडीची तयारी पूर्ण झाल्यानंतर 29 ऑक्‍टोबरला फुलेनगर (ता. वाई जि. सातारा) येथील शेतकरी उमेश दत्तात्रय खामकर या शेतकऱ्याकडून 400 रोपे प्रतिरोप 5 रूपये दराने आणण्यात आली. विंटर डॉन या जातीच्या या रोपांची नियोजनबध्द लागवड 30 ऑक्‍टोंबरला दोन गुठ्यांत गादी वाफ्यावर करण्यात आली. संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. भास्कर काजरेकर आणि डॉ. विवेक सांवत-भोसले, डॉ. विलास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या रोपांची देखभाल करण्यात आली.

गादी वाफ्यावर गवताचे आच्छादन करण्यात आले. या रोपांना गार्डन पाईपद्‌वारे पाणी देण्यात आले. सध्या जिल्ह्यात सतत बदलणारे वातावरण असताना देखील कृषी प्रतिष्ठानच्या अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करीत रोपांची काळजी घेतली. जीवामृताचा वापर केलेल्या या रोपांची वाढ देखील चांगली झाली. अवघ्या 27 व्या दिवशी रोपांना पांढऱ्या रंगाची फुले येऊ लागली.

त्यानंतर फळधारणेला सुरूवात झाली. 42 व्या दिवशी काही झाडांना लागलेली फळे परिपक्‍व झाली आहेत. या फळांचे वजन साधारणपणे 12 ग्रॅम आहे. अतिशय चांगल्या दर्जाची फळे सध्या येथे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे स्ट्रॉबेरी लागवडीचा हा प्रयोग प्राथमिक टप्प्यात यशस्वी झाला आहे. लागवड केलेल्या रोपांना मरचे प्रमाण देखील कमी आहे. 400 पैकी फक्त 10 रोपांची मर झाली आहे. 

प्राथमिक टप्प्यात हा प्रयोग यशस्वी झाला आहे. पुर्णत: हा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यासह कोकणातील शेतीच्या दृष्टीने महत्वाचा प्रयोग ठरणार आहे. लागवड केलेल्या प्रक्षेत्राला सध्या अनेक शेतकरी आणि शेतीप्रेमी भेट देत आहेत. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी कृषी प्रतिष्ठानचे शास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे, विकास धामापुरकर, डॉ. केशव देसाई, समेधा तावडे, प्रा. धीरज पवार, मंगेश पालव, नरेंद्र सावंत, मिलिंद घाडीगावकर, हेमंत घाडीगावकर, रवि घाडीगांवकर, रणजित गोळवनकर आदींनी प्रयत्न केले. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com