महाडमध्ये बहरली स्ट्रॉबेरी 

सुनील पाटकर
बुधवार, 26 डिसेंबर 2018

महाड : लाल चुटूक स्ट्रॉबेरी म्हटले की, चटकन डोळ्यासमोर येते ते महाबळेश्वर. महाबळेश्वर व परिसरातच स्ट्रॉबेरीचे पिक येते असा समज शेतकरी वर्गात रुढ झालेला आहे. परंतु याला बगल देत महाड व पोलादपूरमध्ये स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. महाड जवळील चांभारखिंड येथील गणेश खांबे यांनी रायगडातही स्ट्रॉबेरी पिकवली जाऊ शकते हे सिध्द करुन दाखवले आहे. 
 

महाड : लाल चुटूक स्ट्रॉबेरी म्हटले की, चटकन डोळ्यासमोर येते ते महाबळेश्वर. महाबळेश्वर व परिसरातच स्ट्रॉबेरीचे पिक येते असा समज शेतकरी वर्गात रुढ झालेला आहे. परंतु याला बगल देत महाड व पोलादपूरमध्ये स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. महाड जवळील चांभारखिंड येथील गणेश खांबे यांनी रायगडातही स्ट्रॉबेरी पिकवली जाऊ शकते हे सिध्द करुन दाखवले आहे. 

भाताचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या रायगडात भातशेती धोक्यात येत आहे. त्यामुळे नवीन पिके घेऊन शेती वाचवण्यासाठी कृषि विभाग प्रयत्न करत आहे. तालुका कृषि अधिकारी विजय पांढरे यांच्या पुढाकारांने चांभारखिंड येथील गणेश खांबे यांच्या शेतात स्ट्रॅाबेरीची लागवड करण्यात आली आहे. खांबे यांनी आपल्या साविञी नदी काठी असलेल्या आडीच एकर शेतीमध्ये स्ट्राबेरी बरोबरच कृषि विभागाच्या व आत्मा अंर्तगत लाल माठ, वाल, पावटा, हरभरा हि पिके घेतली आहेत. स्ट्रॅबेरी साठी ते स्वत: स्वेच्छेने समोर आले व यशापयाशाचा विचार न करता आँक्टोबरमध्ये स्ट्राबेरी लागवड केली. स्ट्रॉबेरी या फळाबद्दल अनेकांना अप्रुपही असते. उच्चभ्रु लोकांचे फळ अशी स्ट्रॉबेरीची ख्याती होती. केवळ महाबळेश्वरला गेलेला पर्यटक अशी स्ट्रॉबेरी घेऊन येताना दिसत असे. परंतु आता हे चित्र बदलतेय आता रायगडातही स्ट्रॉबेरी बहरणार आहे.

स्ट्रॉबेरीसाठी हवामान थंड व प्रारंभी भरपूर पाणी लागते. खांबे यांनी केलेल्या स्ट्राबेरीसाठी 15 गुंठयाला 1 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. तर उत्पादीत होणारी स्ट्राबेरीचा त्यांनी महाड येथील राष्ट्रीय महामार्गावर स्टॉल लावला विक्री केली असता, प्रति किलो 150 रूपये प्रमाणे दर मिळत आहे. त्यामुळे यातून अडीच लाखांपर्यंत उत्पादन मिळण्याची शक्याता आहे. खांबे यांनी स्ट्रॉबेरीच्या जाती मध्ये विंटर डाऊन, स्विट सेंन्सेन, एलीना, सॅन अॅनड्रीयाज या सर्व जाती लावल्या आहेत.  

''कोकणामध्ये खरीप हंगामातत भात, रब्बी मध्ये स्ट्रॅाबेरी व उन्हाळयामध्ये कलिंगड या पिक पध्दतीचा वापर केल्यास शेतकऱ्याला वार्षिक 2 लाख रूपये निव्वळ नफा मिळू शकतो, कुटुंबाला रोजगाराचे साधन व आर्थिक स्थैर्य मिळते.'' 
- विजय पांढरे (तालुका कृषि अधिकारी, महाड)  

''भाता बरोबरच शेतक-यांनी आता नविन पिकांकडे वळले पाहिजे व त्यासाठी मेहनत करुन बाजारपेठही शोधली पाहिजे.'' 
- गणेश खांबे ( शेतकरी)
 

Web Title: Strawberry Blooming in Mahad