संघर्ष...बिबट्या आणि माणसाचा

संघर्ष...बिबट्या आणि माणसाचा

कसा असतो बिबट्या
बिबट्या व चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील प्राणी. दोघामध्ये फरक आहे. चित्ता भारतातून नामशेष झाला आहे, तर बिबट्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बिबट्याच्या अंगावर पोकळ टिपके आढळतात आणि शरीरयष्टी मांजराप्रमाणे भरीव असते. बिबट्याचे भारतीय बिबट्या, श्रीलंकी बिबट्या, आफ्रिकी बिबट्या, उत्तर चिनी बिबट्या, चीनी भारतीय बिबट्या, अरबी बिबट्या, अमूर बिबट्या, कॉफेशियाई बिबट्या अशा उपप्रजाती अस्तित्वात आहेत. कोकणातील सिंधुदुर्गाही मोठ्या संख्येने बिबट्याचे अस्तित्व आढळते.

जिल्ह्यात पट्टेरी वाघाच्या अस्तित्वाबद्दल अनेक तर्क वितर्क आहेत. पट्टेरी वाघ नागरिकांनी बघितल्याच्या काही किरकोळ घटना सांगण्यात येतात. बिबट्याचे अस्तित्व मात्र जिल्ह्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात आढळते. बिबट्याच्या अस्तित्वाबाबत अंदाज वर्तविला असता ५५ हजार हेक्‍टरवर वनक्षेत्र आहे. खासगी व सामायिक वनक्षेत्राचा विचार केला असता जिल्ह्यात जवळपास २५० च्या आसपास बिबट्यांचे अस्तित्व असल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात येत आहे.

मानव-बिबट्या संघर्ष
वाघाप्रमाणे बिबट्यामध्ये खूप मोठ्या प्राण्यांची शिकार करण्याची क्षमता नसते. त्याच्या शिकारीच्या कुवतीमधील प्राणी मानवी वस्तीमध्येच सापडतात. यामध्ये कुत्रे, बकरी, डुक्कर, मोकाट गुरे, कमी प्रतिकार क्षमता असलेले प्राणी हे त्याचे खाद्य असते. त्यामुळे बिबट्या वस्तीकडे घुसण्याचे प्रकार वाढले आहे. यातच दाट जंगलाची घटलेली संख्या, तेथे लहान प्राण्यांचे कमी झालेले अस्तित्व आणि जंगलाच्या जवळ सरकलेली वस्ती यामुळे सिंधुदुर्गात बिबट्याचा वस्तीलगतचा वावर वाढला आहे. साहजिकच दहा-बारा वर्षात बिबट्या आणि मानव संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.  

जिल्ह्यात बिबट्या विहिरीत पडला असल्याच्या घटना सरासरी दर दोन महिन्यांनी घडतात. जिल्ह्यात अनेक खासगी विहिरींना कठडे नाहीत. या कठड्याविना असलेल्या विहिरीच्या जवळपास फिरकणारा बिबट्याचा तोल नेमका विहिरीत जातोच. वनविभागाकडून यंत्रणा राबवून बिबट्याला पिंजऱ्यातून सुरक्षित बाहेर काढून जंगलात सोडण्यात येते. आवश्‍यक असल्यास उपचारही करण्यात येतात. 

उपद्रव मर्यादित
हत्ती वगळता अन्य प्राण्यांकडून २०१७ पर्यंत २१ वेळा मानवावर हल्ले झाल्याच्या घटना आहेत. जिल्ह्यामध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यावर व पशुधनावर हल्ले करून नुकसान करण्याचे अनेक प्रकार घडले असले तरी मानवावर हल्ले करण्याचा प्रकार घडले नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. बिबट्या विनाकारण मानवावर हल्ला करणारा प्राणी नसून स्वसंरक्षण म्हणून हल्ला करू शकतो. गोव्यात कामानिमित्त रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या काही युवकांच्या दुचाकीसमोर बिबट्या वारंवार आड येण्याच्या घटना मात्र घडल्या आहेत. तसेच दुचाकीवर उडी मारल्याची किरकोळ घटना यापूर्वी घडली आहे. २०१८ मध्ये कोणत्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही.

पशुधनाची मात्र हानी
बिबट्याकडून पशुधनावर हल्ले झाल्याच्या बऱ्याच घटना आहेत. गतवर्षीपर्यत १२९ प्रकरणे बिबट्याच्या हल्याची झाली आहेत. यामुळे पशुधनाचे मोठे नुकसान होत आहे. बिबटा कमी प्रतिकार शक्ती असलेल्या प्राण्यावर सहज हल्ला करतो. यात गाय, म्हैस, बैल, रेडा, बकर, कोंबडी यांचा सामावेश होतो. २०१८-१९ या वर्षात ३८ प्रकरणे आतपर्यंत झाली आहेत. शेतकऱ्यांसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे.

बिबट्याच्या गळ्याला फास
सिंधुदुर्गात वनविभागाच्या दाव्यानुसार बिबट्याची संख्या वाढत आहेत, असे असताना रानात शिकारीसाठी लावण्यात आलेला फास मात्र बिबट्याची संख्या कमी करणारा ठरत आहे. जिल्ह्यात फासकीत बिबट्या अडकल्याच्या, तसेच बिबट्या मृत झाल्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत. रानडुक्कर, खवले मांजर, अशा विविध जैविकांना पकडण्यासाठी मानवाकडून जंगलात फासकी लावण्यात येतात. या फासकीत बिबट्या अडकून तो मृत किंवा त्याला वनविभागकडून सुटका केली जातो. मानवी स्वार्थापोटी बिबट्याला स्वतःचा जीव धोक्‍यात घालावा लागत आहे. 

शिकारीचा संशय
जिल्ह्यात शिकारीची परंपरा लक्षात घेता पूर्वी रानडुक्‍कर, सांबर, हरीण, ससे, पिसई, साळींदर आदी प्राण्यांची प्रामुख्याने मांसासाठी शिकार होत असे; मात्र बिबट्याला मारले जात नसे. अलीकडे जिल्ह्यात बिबट्याचीही शिकार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा संशय आहे. बिबट्या फासकीत अडकून मेल्याच्या घटना बरेचकाही सांगून जातात. शिवाय पायाचे पंजे तोडलेल्या स्थितीतील बिबट्याचे मृतदेह सापडल्याच्या घटनाही बोलक्‍या आहेत. सिंधुदुर्ग व परिसरात गेल्या आठ-दहा वर्षात बिबट्याचे कातडे पकडल्याच्या घटनाही याकडे बोट दाखवत आहेत; मात्र यावर नियंत्रण सोडाच त्याचा ठोस तपासही वनविभाग किंवा अन्य सुरक्षा यंत्रणांनी केलेला नाही. 

जैवविविधतेच्या साखळीतील दुवा
डोंगरपायथ्याशेजारी मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. वन्यप्राण्यांकडून ज्या प्रमाणात शेतीचे नुकसान होते. त्यानुसार उंदीर, डुक्कर, पक्षी, घुशी, रानगवे, सांबर याकडूनही शेतीचे नुकसान होते. बिबटा हा छोट्या शेतीसाठी नुकसान ठरणाऱ्या अशा अनेक उभयचर प्राण्यांनाही भक्ष करीत असतो. यामुळे शेतीचेही अनपेक्षितपणे रक्षण होते. जैवविविधतेच्या साखळीत बिबटा हा महत्त्वाचा दुवा ठरत आहे. त्याची संख्या घटल्यास अन्नसाखळी आणखी अडचणीत येणार आहे. पिकांचे प्राण्यांमुळे नुकसान होत असल्यामुळे पड क्षेत्रात वाढ होत गेली. सिंधुदुर्गात २०१५-१६ च्या हत्ती हटाव मोहिमेनंतर पीक नुकसानीत घट झाली होती. २०१४-१५ ला हत्ती व अन्य प्राण्यामुळे १ हजार ७२३ प्रकरणे झाली. हत्ती हटाव मोहिमेनंतर २०१५-१६ ला ८६६ तर २०१६-१७ ला ८९० एवढी प्रकरणे झाली. २०१७-१८ ला ७०६ एवढी तर यंदा २०१८ पर्यत ५४८ एवढी प्रकरणे झाली आहेत. या अंतर्गत कोट्यवधी रुपयांची पीक नुकसानी दिली आहे. बिबट्याचे भक्ष असलेले रानगवे, माकडे, रानडुक्कर यांच्याकडून पीक नुकसानी झाली. बिबट्याची संख्या वाढल्यास पीक नुकसान कमी होणार आहे. 

वनविभागासमोर आव्हान
कोकणचा सिंधुदुर्ग वगळता अन्य राज्यात जंगलात मोठ्या प्रमाणात फासकी लावण्याचे प्रकार घडतात. वनविभागाकडून वन्यप्राण्याची तसेच त्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्‍या वनविभाग आवळते. सिंधुदुर्गात फासकी लावणारे सराईत मात्र गुलदत्यातच राहतात. जंगलात वन्यप्राण्याचा फासकीत जीव गेल्यास फासकी कोणी लावली याचा शोध वनविभागकडून घेण्यात येत नाही. जंगलात फासकी लावणे तसेच शिकार करणे हा वन्यजीव अधिनियम १९७२ कलम ९ नुसार गुन्हा आहे. यासाठी ३ ते ७ वर्षाची शिक्षा तसेच १० हजार रुपयांचा दंड अशी तरतुद आहे. फासकी लावणाऱ्याचा शोध घेवून कारवाई झाल्यास वन्यप्राण्यांचा धोका कमी होऊ शकतो.

बिबट्या हा अन्नसाखळीमधील प्रमुख प्राणी आहे. त्यांची वाढती संख्या लक्षात घेता आपले जंगल समृद्ध आहे हे सिद्ध होते. मानव वन्यप्राणी हे पूर्वापार सोबत राहत आलेले आहेत. त्यांच्या मध्ये संघर्ष नसून सहजीवन आहे. हे सत्य प्राण्यांनी मान्य केले आहे. हे आता माणसांनी मान्य करणे काळाची गरज आहे. बिबट्या हे जंगलाचे वनवैभव आहे, हे समजून घ्यावे. बिबट्यापासून धोका नसून स्वसंरक्षण करणारा प्राणी आहे.
- गजानन पाणपट्टे,
वनक्षेत्रपाल, सावंतवाडी वनक्षेत्र

अलीकडे बिबट्याच्या संख्येत वाढ झाली आहे. मानवाला भक्ष्य करण्यासाठी वस्तीत बिबट्या येत नसून बिबट्याचे प्रमुख भक्ष्य पाळीव प्राणी असतात. सिंधुदुर्गात बिबट्या वस्तीत येण्याचे प्रकार बरेच आहेत. अन्नसाखळीमधील महत्त्वाचा घटक असल्यामुळे पड क्षेत्रात बिबट्यामुळे घट होत आहे, ही एक चांगली बाब आहे. शेतीतील उपद्रवी प्राण्यांना बिबट्या भक्ष्य करतो. बिबट्या हा संिधसाधू प्राणी असून, कष्ट करून व जास्त हालचाल करून खाण्यापेक्षा जवळचा भक्ष्य खाणे, हा त्याचा स्वभाव आहे.
- सुभाष पुराणिक,
उपवनसंरक्षक, सावंतवाडी

सिंधुदुर्गातील वन्य पशू जनगणनेत आढळलेली वनक्षेत्रवार बिबट्यांची संख्या 
वनक्षेत्र    संख्या
आंबोली    ४२
कणकवली    ०
सावंतवाडी    १०
कडावल    २४
कुडाळ    ३०
दोडामार्ग    ०६

विहिरीत व फासकीत बिबट्या अडकल्याच्या घटना
वर्ष    प्रकार 
२०१५- १६    २
२०१६-१७    ०
२०१७-१८    ०
२०१८-१९    ४

वर्ष    वन्य प्राणी नुकसान प्रकरणे    प्रत्यक्ष नुकसान
२०१४-१५    १४२    १० लाख ९५ हजार ४९८
२०१५-१६    १२८    ९१ हजार ३०१
२०१६-१७    ९८    ९ लाख १२ हजार २३०
२०१७-१८    १२९    १३ लाख ९५ हजार १००
२०१८-१९(जाने)    ३८    ४ लाख २ हजार १२५
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com