esakal | लाॅकडाऊन काळात 'त्या' दोघांनी फुलविला भाजी मळा
sakal

बोलून बातमी शोधा

student doing farming during lockdown time in ratnagiri

सांडेलवागण येथील दोन विद्यार्थ्यांनी शेंद्रिय पद्दतीने भाजी लागवड केली आहे.

लाॅकडाऊन काळात 'त्या' दोघांनी फुलविला भाजी मळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - लॉकडाऊनचा सदुउयोग करत सांडेलवागण येथील दोन विद्यार्थ्यांनी शेंद्रिय पद्दतीने भाजी लागवड केली आहे. 
यातील राहुल बेनेरे हा विद्यार्थी रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात शिकत आहे तर धनंजय पाष्टे हा तृतीय वर्ष कला शाखेत शिकत आहे.

लॉकडाऊननंतर सर्वसामान्य माणसाला विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये अनेकांचे व्यवसाय, रोजगार ठप्प झाले. 
लॉकडाऊन काळात काय करायचे? रोजगाराचा  प्रश्न कसा सोडवायचा हा दोघांसमोरही प्रश्न होता. या संदर्भात प्रसाद पाष्टे यांच्याशी चर्चा केली. त्यातून  भाजी लागवड निश्चित करण्यात आले. धनंजय पाष्टे यांच्या पडक्या घराची जागा वापरात नव्हती, तसेच नवीन घराजवळसुद्धा थोड्या प्रमाणात जागा शिल्लक होती. त्यात विविध प्रकारचे सामान या भागात ठेवलेले होते. ते साफ करून घेतली आणि त्यातच हे काम करण्याचे निश्चित झाले. त्यानंतर वाटद खंडाळा येथील भाजी व्यावसायिक राकेश वरवटकर आणि हातखंबा झरेवाडी येथील कृषी विद्यार्थी प्रतीक कळंबटे यांनी फोनवर व व्हिडीओ कॉल द्वारे माहितीसहकाही प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले. त्यातून एक एक बाजू समजून घेत हा प्रकल्प उभा केलेला आहे. 


यासाठी लागणारी बियाणे, सेंद्रिय खते, फवारणीची साधने असा काही प्रमाणात खर्च होता. ही लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला करायचे, असे ठरले. त्यामुळे त्याअगोदरचा पंधरा दिवसांचा कालावधी इकडे तिकडे रोजगाराची कामे करून या दोघांनी एकत्रित केला. त्यानंतर ६ ते ७ गुंठ्यांत पडवळ, कारले, भोपळा, भेंडी, दोडके, गवार ही पिके घेतली. सध्या त्याची फळनिर्मिती प्रक्रिया सुरू झाली. 

विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला पंचायत समिती सदस्या साक्षी रावनांग, सामाजिक कार्यकर्ते संतोष रावनांग यांचे मार्गदर्शन लाभले. सांडेलावगण गावचे ग्रामस्थ जयवंत बेनेरे, परशुराम पाष्टे, सुरेश पाष्टे, वसंत पाष्टे विनायक गावडे, आकाश सावरकर, तुषार मांडवकर, प्रणाली बैकर, सोनाली कुरतडकर, साक्षी कुरतडकर, अनिकेत बेनेरे, राजेश पाष्टे, मिथुन पाष्टे, सुयश बेनेरे, रोशन बेनेरे यांचे सहकार्य लाभले.


 "१० वी आणि १२ वी नंतर कोकणातील मुलांचे शिक्षण कमी होते. त्यानंतर ते छोट्या-छोट्या नोकऱ्यांकडे वळतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही मुले योग्य त्या उच्च शिक्षणाकडे वळू शकतात. सोबतच उद्योगांना सुद्धा ते प्राधान्य देऊ शकतात."

- राहुल बेनेरे,  विदयार्थी 


 "वाचनालयातील वाचनातून आणि अनुभवातून आपल्या पोटाची सोय कशी करता येईल याचा आम्ही सातत्याने विचार करीत आलो. त्यामुळे आज लॉकडाऊन असताना आम्ही ही शेती केली. आहे"

- धनंजय पाष्टे,  विद्यार्थी
 


संपादन- धनाजी सुर्वे 

loading image