मालगाडीवर पुलावरून उडी टाकून विद्यार्थ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

वसतिगृहात राहणाऱ्या नागावासू याने मित्रांना कॉलेजला जातो, असे सांगून सकाळी साडेआठ वाजता वसतिगृह सोडले. तो दहिवली येथील रेल्वे पुलावर आला होता. त्या दरम्यान गोव्याकडून पनवेलच्या दिशेने जाणारी मालगाडी सावर्डे रेल्वे स्थानकातून भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी तो रेल्वे पुलावर उभा होता.

सावर्डे - चिपळूण तालुक्‍यातील खरवते येथे एका विद्यार्थ्याने धावत्या मालगाडीवर उडी मारून आत्महत्या केली. नागावासू मुकन्टी मादासू (वय 19, मूळ गाव कंचर, ता. गुढ्ढा, जि. गुंटूर, आंध्र प्रदेश) असे त्याचे नाव आहे. तो एका कृषी महाविद्यालयात शिकत होता. 

वसतिगृहात राहणाऱ्या नागावासू याने मित्रांना कॉलेजला जातो, असे सांगून सकाळी साडेआठ वाजता वसतिगृह सोडले. तो दहिवली येथील रेल्वे पुलावर आला होता. त्या दरम्यान गोव्याकडून पनवेलच्या दिशेने जाणारी मालगाडी सावर्डे रेल्वे स्थानकातून भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी तो रेल्वे पुलावर उभा होता. मालवाहतूक गाडी पुलाजवळ आल्यानंतर त्याने धावत्या रेल्वेवर उडी टाकली. धावत्या रेल्वेच्या धक्‍क्‍याने तो जागीच गतप्राण झाला. त्याचे दोन्हीही पाय तुटले. त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर पडला होता. एका रेल्वे कर्मचाऱ्याने ही घटना पाहिली. सावर्डे रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्यांनी ही माहिती सावर्डे पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

नागावासू स्वभावाने शांत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. त्याचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आंध्र प्रदेशातून निघाले आहेत. या घटनेची नोंद सावर्डे पोलिस ठाण्यात झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सचिन इंगोले तपास करीत आहेत. 

Web Title: student suicide in ratnagiri