अपशिंगेतील विद्यार्थ्यांनी अनुभवला 'आयपीएल'चा थरार

सुनील शेडगे
रविवार, 14 एप्रिल 2019

नागठाणे : रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केराॅन पोलार्ड, स्टीव्ह स्मिथ हे दिग्गज क्रिकेटपटू एरवी दिसतात टीव्हीवर. मात्र अपशिंगेतील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना काल 'आयपीएल' सामन्याच्या निमित्ताने या सर्वांना 'याची देहा याची डोळा' पाहाण्याची अपूर्व संधी लाभली.

नागठाणे : रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केराॅन पोलार्ड, स्टीव्ह स्मिथ हे दिग्गज क्रिकेटपटू एरवी दिसतात टीव्हीवर. मात्र अपशिंगेतील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना काल 'आयपीएल' सामन्याच्या निमित्ताने या सर्वांना 'याची देहा याची डोळा' पाहाण्याची अपूर्व संधी लाभली.

अपशिंगेची प्राथमिक शाळा ही जिल्ह्यातील नामांकित शाळांमध्ये गणली जाते. नुकताच 'आंतरराष्ट्रीय शाळे'चा बहुमान तिला लाभला आहे.  कालच या शाळेतील 300 विद्यार्थ्यांना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 'आयपीएल'चा थरार अनुभविण्याची अनोखी संधी लाभली. मुंबई इंडियन्स अन् राजस्थान रॉयल्स यांच्यात ही लढत रंगली. यावेळी विद्यार्थ्यांना कित्येक 'स्टार प्लेअर' प्रत्यक्ष पाहता आले.

रोहित, हार्दिक, डिकाॅक, जाॅस बटलरची फटकेबाजी, जसप्रित बुमरा, क्रुणाल पंड्याची भेदक गोलंदाजी, पोलार्ड, स्टोक्सचे उच्च दर्जाचे क्षेत्ररक्षण अनुभवता आले. महत्त्वाचे म्हणजे उच्च श्रेणीतील सामन्याचा 'माहोैल', त्यातील रोमांचकता याची प्रचीती घडली. एरवी ग्रामीण भागातील मुलांना खेळाचे हे अदभूत विश्व तसे दुर्मिळच. मात्र काल रात्रीच्या सामन्यातून त्यांना त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेता आली. विद्यार्थ्यांसोबत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्यही यावेळी उपस्थित होते. ग्रामस्थांचेही याकामी महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

'रिलायन्स फाउंडेशन'चा पुढाकार 

विद्यार्थ्यांच्या 'आयपीएल' दर्शनाचा सारा भार 'रिलायन्स फाउंडेशन'ने उचलला. त्यात अपशिंगेतून मुंबईला रवाना होण्यासाठी सात आरामबसची सोय करण्यात आली होती. विद्यार्थ्यांसाठी मुंबई इंडियन्सचे टी- शर्ट, कॅप, स्टीकर्स, फ्लॅग, नोटबुक तसेच पाण्यापासून भोजनापर्यंतची सारी सुविधा पुरविण्यात आली होती.

Web Title: The students of Upashcheni experience the IPL