विरोध नसलेल्या ठिकाणी रिफायनरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

कणकवली - शिवसेना दिलेल्या वचनाला जागते. त्यामुळे नाणारमधून रिफायनरी प्रकल्प हटवण्यात आलाय. महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा प्रकल्प होणार असेल व स्थानिकांचा त्याला पाठिंबा असेल तर आम्ही विरोध करणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

कणकवली - शिवसेना दिलेल्या वचनाला जागते. त्यामुळे नाणारमधून रिफायनरी प्रकल्प हटवण्यात आलाय. महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा प्रकल्प होणार असेल व स्थानिकांचा त्याला पाठिंबा असेल तर आम्ही विरोध करणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

आडाळी एमआयडीसीमध्ये वीज व पाणी उपलब्धता केली जात आहे. गोव्यातील उद्योजकांच्या माध्यमातून तेथे मोठी रोजगार संधी निर्माण होईल. तर नेत्यांप्रमाणे कार्यकर्त्यांचेही मनोमिलन निश्‍चितपणे होईल. त्याअनुषंगाने आज नवी मुंबईत कोकण विभागातील शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होत असल्याचीही माहिती श्री. देसाई यांनी दिली.

येथील विजय भवन येथे श्री. देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. खासदार विनायक राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सिंधुदुर्गात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हासंपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, ॲड.हर्षद गावडे, सुशांत नाईक यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 श्री. देसाई म्हणाले, ‘‘नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याचा वादा आम्ही जनतेसोबत केला होता. तो आम्ही पूर्ण केला. आता तेथे रिफायनरी प्रकल्प येणार नाही. तर राज्यात अन्य ठिकाणी जेथे जागा उपलब्ध असेल तेथे होईल. सध्या नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्पासाठी संमतीपत्रे घेतली जात आहेत. पण प्रकल्पच रद्द झाल्याने या संमत्तीपत्राचा काही उपयोग नाही.

ते म्हणाले, मागील २५ वर्षात सिंधुदुर्गात रोजगार आले नाहीत. हा बॅकलॉग आम्ही भरून काढत आहोत. आडाळी एमआयडीसीमध्ये गोव्यातील उद्योजकांसाठी जागेची निश्‍चिती झाली आहे. आचारसंहिता संपताच तेथे उद्योग उभारणीचे काम सुरू होईल. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी निर्माण होणार आहेत. आनंदवाडी बंदर प्रकल्पाचेही काम लवकरच सुरू होत आहे.  सिंधुदुर्ग रत्नागिरी भाजप, आरपीआय व इतर काही युतीमधील पक्ष नाराज असले तरी त्यांची समजूत काढण्याचे काम वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. शिवसेनेसोबत भाजप, आरपीआय आदींचेही झेंडे व पदाधिकारी प्रचारामध्ये सक्रिय 
झालेले दिसतील.’’

शिवसेना-भाजपला एकमेकांची गरज
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे. स्थानिक पातळीवर कुरघोड्या, वाद आम्ही निश्‍चितपणे मिटवू व पूर्वीप्रमाणे या निवडणुकीतही युतीचे कार्यकर्ते एकदिलाने काम करतील, असे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. 

विरोधक नेस्तनाबूत होतील
शिवसेना व भाजप या पक्षांमधील युती भक्‍कमपणे या निवडणुकीत उभी आहे. नेत्यांचे मनोमिलन झाले तसेच कार्यकर्त्यांचेही होतेय. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीची पळापळ सुरू झाली आहे. आम्ही आत्ताच एवढी मुसंडी मारली की, विरोधक लटपटू लागले आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीत तर विरोधक नेस्तनाबूत होतील, असेही श्री. देसाई म्हणाले.

Web Title: Subhash Desai comment