जिल्हा परिषद शाळांत यशस्वी विद्यार्थ्यांचे फलक

प्रशांत हिंदळेकर
शुक्रवार, 19 मे 2017

प्रवेशवाढीसाठी मालवणात अभिनव उपक्रम : प्रशालेचा दर्जा सुधारण्यावरही भर

मालवण - इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा असलेला ओघ लक्षात घेत तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढावा यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या संकल्पनेतून शिक्षण विभागाने ग्रामीण भागात अभिनव उपक्रम 
सुरू केला आहे. 

प्रवेशवाढीसाठी मालवणात अभिनव उपक्रम : प्रशालेचा दर्जा सुधारण्यावरही भर

मालवण - इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा असलेला ओघ लक्षात घेत तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढावा यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या संकल्पनेतून शिक्षण विभागाने ग्रामीण भागात अभिनव उपक्रम 
सुरू केला आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जे शिकून उच्च पदापर्यंत पोचले त्यांची नावे, शाळेतील शैक्षणिक दर्जा, प्रशालेतील विविध सुविधा, मिळालेले पुरस्कार, डिजिटल शिक्षण यासह अन्य सुविधांची माहिती देणारे फलक शाळा परिसरांमध्ये लावून शैक्षणिक उठाव केला जात आहे. 

तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या २०५ शाळा आहेत. त्यात१४६ प्राथमिक व ५९ उच्च प्राथमिक आहेत. खासगी स्वरूपातील अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अनुदानित, इंग्रजी माध्यम व हायस्कूल अशा ४७ शाळांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात मराठी माध्यमाऐवजी इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा कल जास्त असल्याचे दिसून आले. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तज्ज्ञ तसेच पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त असल्याने याचाही परिणाम पटसंख्येवर झाल्याचे दिसून आले. इंग्रजी माध्यमातच आपला मुलगा शिकला पाहिजे अशी पालकांची इच्छा असल्याने ग्रामीण भागातीलही अनेक पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच दाखल करत असल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याची भीती निर्माण झाली. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्याबरोबरच दर्जेदार शिक्षण देण्यावर गेल्या चार पाच वर्षात भर देण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावरच उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विविध उपक्रम राबवून प्रशालेचा दर्जा वाढविण्यावरही भर दिला जात आहे. अशा परिस्थितीतही अद्याप इंग्रजी माध्यमांकडील पालकांचा कल कमी झालेला दिसून येत नसल्याने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी फलकाच्या माध्यमातून प्रशालेची माहिती प्रसिद्ध करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्याची संकल्पना मांडली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलेली मुलेच आयपीएस. आयएएस यासारख्या पदांवर पोचत असल्याचा पालकांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षण घेतलेली बरीच मुले आज मोठ्या पदांवर कार्यरत आहे.

त्यामुळे तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत उच्च पदावर पोचलेल्या व्यक्तींचा शोध घेत त्यांची माहिती फलकांवर प्रसिद्ध करण्याबरोबरच प्रशालेतून विद्यार्थ्यांना दिले जाणारे दर्जेदार शिक्षण, विविध उपक्रम याची माहितीही शाळा परिसरात फलकांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यास सुरवात करण्यात आली आहे. मे महिन्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होत असल्याने त्यांनाही या उपक्रमाची माहिती व्हावी यासाठी तालुक्‍यातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या परिसरात सध्या असे फलक लावून प्रसिद्धी करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी प्रयत्न केले असून या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळून यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशाची संख्या निश्‍चितच वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

तालुक्‍यात २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या ६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा सर्व्हे शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आला. यात ७२२ विद्यार्थी पहिलीच्या वर्गात दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यातील जास्तीत जास्त मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत कशी दाखल होतील यादृष्टीने शिक्षण विभागाने शाळेच्या विविध उपक्रमांची, पुरस्कार, मोठ्या पदावर पोचलेल्या व्यक्तींची छायाचित्रे तसेच अन्य माहिती दर्शविणारे फलक ठिकठिकाणी लावून या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

४५० तज्ज्ञ शिक्षक
जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जाते. शासनाच्या विविध शैक्षणिक गुणवत्ता धोरणात या शाळांतील मुलांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावरही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा यातही जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी यश मिळविलेले आहे. डिजिटल, स्मार्ट वर्ग यासारखे उपक्रम राबविताना मुलांना संगणकाशी जोडले जात आहे. विज्ञान-तंत्रज्ञान यांचे शिक्षण देताना क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातही मुलांना प्रोत्साहित करण्याचे काम केले जात आहे. हे सर्व दर्जेदार शिक्षण सुमारे ४५० तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून मोफत दिले जात आहे.

Web Title: success student board in zp school