तटरक्षकच्या ‘डॉर्नियर’ विमानाचे यशस्वी लॅंडिंग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या रत्नागिरी विमानतळाची धावपट्टी तटरक्षक दलाची विमाने उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. तटरक्षक पश्‍चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक विजय डी. चाफेकर यांच्या ‘डॉर्नियर’ विमानाने गुरुवारी (ता. नऊ) प्रथमच यशस्वी लॅंडिंग केले.

रत्नागिरी - गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या रत्नागिरी विमानतळाची धावपट्टी तटरक्षक दलाची विमाने उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. तटरक्षक पश्‍चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक विजय डी. चाफेकर यांच्या ‘डॉर्नियर’ विमानाने गुरुवारी (ता. नऊ) प्रथमच यशस्वी लॅंडिंग केले. रत्नागिरी विमानतळावरील ही धावपट्टी लवकरच तटरक्षक दलाचे अद्ययावत व प्रमुख तळ बनविण्यासाठी आवश्‍यक कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्राधान्य दिले आहे, असे याप्रसंगी श्री. चाफेकर यांनी सांगितले. 

सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कमांडर महानिरीक्षक चाफेकर यांचे विमान उतरले. कमांडर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर श्री. चाफेकर यांचा हा पहिलाच दौरा आहे. २०१५ पासून धावपट्टीच्या नूतनीकरणासाठी सुरू असलेल्या कामामुळे रत्नागिरी विमानतळातून विमान वाहतूक बंद होती. अत्यावश्‍यक वेळी हेलिकॉप्टर उड्डाणे सुरू ठेवली होती. हे काम सध्या पूर्ण झालेले असून, त्यावर चाचणी उड्डाणे हाती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या सागरी गस्तीसाठी तटरक्षक दलाची विमाने व हेलिकॉप्टर रत्नागिरी विमानतळावरून नियमित भरारी घेतील. 

गुरुवारी झालेले उड्डाण ही पहिली चाचणी असल्यामुळे त्याला 
विशेष महत्त्व आहे. धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे त्याची पाहणी करण्यासाठी आणि रत्नागिरी येथे स्वतंत्र तटरक्षक वायू अवस्थान कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी तटरक्षक पश्‍चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक श्री. चाफेकर यांनी रत्नागिरी विमानतळावरील तटरक्षक अवस्थानाच्या कार्यालयाला भेट दिली. सकाळी ८.३० वाजता कार्यालयाचे प्रमुख कमांडंट एस. आर. पाटील यांनी रत्नागिरी विमानतळावर स्वागत केले. दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ते विमानाने मुंबईकडे रवाना झाले.

‘तटरक्षक’ची ही कामे होणार
रत्नागिरी कार्यालयाने हाती घेतलेल्या सागरी सुरक्षा उपाययोजना, सागरी शोध व बचाव मोहीम, समुदाय संवाद कार्यक्रम, प्रशिक्षण, प्रशासकीय इमारत, रहिवासी सदनिका, भगवती येथे उभारले जाणारे जहाज दुरुस्ती केंद्र व जेट्टी, भाट्येतील हॉवरपोर्ट, प्रस्तावित विमान हॅंगर, धावपट्टी विद्युतीकरण आदींसह सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण केलेल्या कामांबद्दल कमांडंट एस. आर. पाटील यांनी महानिरीक्षक चाफेकर यांना सविस्तर माहिती दिली.

Web Title: successful landing of Coast Guard's 'Dornier' aircraft