सुदर्शन केमिकल, लासा लॅबोरेटरीला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

महाड - महाड औद्योगिक क्षेत्रातील सुदर्शन केमिकल व लासा लॅबोरेटरी या दोन कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून नोटीस बजावली आहे. या नोटिशीनंतरही या कारखानदारांनी आपल्या कारखान्यात सुधारणा केली नाही तर कारखाना बंद करण्याचा इशारा मंडळाने दिला आहे.

महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक रासायनिक कारखाने आहेत. यापैकी काही कारखान्यांमध्ये प्रदूषण नियंत्रण करणारी यंत्रणा नसल्याने परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. औद्योगिक क्षेत्रातील सुदर्शन केमिकल व लासा लॅबोरेटरी कारखान्यांमध्ये उघड्यावरील घनकचरा, घनकचऱ्याचा वास, दूषित पाणी यासंबंधीच्या तक्रारी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आल्या होत्या. त्यानुसार महाड येथील उपप्रादेशिक कार्यालयाकडून या कंपन्यांना प्राथमिक नोटीस बजावण्यात आली होती; परंतु या नोटिशीकडे संबंधित कारखान्यांनी लक्ष न दिल्याने मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून संबंधित कारखान्यांना अंतरिम नोटीस बजावण्यात आली आहे. त्याअंतर्गत या कारखान्यांकडून दीड ते दोन लाखांची बॅंक गॅरंटी घेण्यात आली आहे. 9 डिसेंबरला मंडळाने बजावलेल्या नोटिशीमध्ये प्रदूषण नियंत्रण करण्याबाबत कंपनीने उपाययोजना करण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. त्यानंतरही कंपन्यांच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर संबंधित कारखाने बंद करण्याचा इशाराही मंडळाने दिला आहे.

नागरिकांच्या तक्रारीनुसार वरिष्ठ कार्यालयाकडून या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
- सागर औटी, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

Web Title: Sudarshan Chemical,Lassa Laboratory of Pollution Control Board Notice