सुधागडमध्ये रस्त भाव दुकानदाराची मुजोरी

अमित गवळे
बुधवार, 30 मे 2018

सुधागड तालुक्यातील हातोंड गावातील निकृष्ट दर्जाचे धान्य दिल्याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या एका वृध्द महिलेस येथील रास्त भाव दुकानदाराने व त्याच्या नातेवाईकांनी शिविगाळ करुन मारहाण केल्याची घटना घडली आहे.

पाली - सुधागड तालुक्यातील हातोंड गावातील निकृष्ट दर्जाचे धान्य दिल्याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या एका वृध्द महिलेस येथील रास्त भाव दुकानदाराने व त्याच्या नातेवाईकांनी शिविगाळ करुन मारहाण केल्याची घटना घडली आहे. रास्त भाव दुकानदार व त्याच्या नातेवाईकांवर त्वरीत कारवाई करावी व रास्त भाव दुकानाचा परवाणा रद्द करावा या मागणीचे निवेदन हातोंड ग्रामस्त व रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बुधवारी(ता.३०) पाली-सुधागड तहसिलदार बी.एन. निंबाळकर यांना देण्यात आले. याबाबत पाली पोलीसस्थानकांत रास्त भाव दुकानदाराविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

सबंधीत रास्त भाव धान्य दुकानदारावर लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा रि.पा.इं रायगड जिल्हा सरचिटणीस सुरेश वाघमारे यांनी दिला आहे. हातोंड गावच्या रास्त भाव दुकानदाराच्या मुजोरीविरोधात तक्रार करुन ग्रामस्थांनी कारवाईसाठी राज्याचे नागरी अन्नपुरवठा मंत्री, जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधिक्षक रायगड, पाली पोलीस निरिक्षक आदिंना निवदेन देण्यात आले आहे. 

हातोंड येथील सावित्रीबाई भागुराम वाघमारे (वय 70 वर्ष) यांनी काही दिवसांपुर्वी नेहमीप्रमाणे रास्त भाव धान्य दुकानात जावून तांदूळ खरेदी केले. तांदूळ शिजवून खात असताना कडू जाणवले. त्याबरोबरच त्यांनी रास्तभाव धान्य दुकानातून आणलेल्या धान्याच्या वजनाची खात्री केली असता ते वजन कमी होते. तसेच ते धान्य (तांदुळ) सरकारी पुरवठ्याचे नसल्याचे त्यांना जाणवले. सावित्रीबाई वाघमारे यांनी या संदर्भात रास्त भाव धान्य दुकानात जावून धान्य कमी वजनाचे व निकृष्ट दर्जाचे दिले असल्याबाबत विचारणा केली.. यावेळी रास्त भाव दुकानदार व त्यांच्या आईने वाघमारे यांना शिवीगाळ करुन मारहाण केली असल्याचे तक्रारी निवेदनात म्हटले आहे. सावित्रीबाई वाघमारे या वृध्द असून त्यांचे दोन्ही हात दुखापतग्रस्त आहेत.

सदर रास्त भाव धान्य दुकानातून अनुसुचीत जाती जमातींना देखील निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असून सरकारी पुरवठ्याच्या धान्यात अफरातफर होत असल्याची तक्रार निवेदनाद्वारे हातोंड ग्रामस्थांनी केली आहे. वृध्द महिलेला मारहाण झाल्याप्रकरणी अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

या प्रकारानंतर परिसरातील सर्व गाव व वाड्यांतून रास्त भाव दुकानदार भोसले यांच्या दुकानातून खरेदी केलेल्या तांदळाचे नमुने जमा करुन तपासणीकरीता पाली सुधागड तहसिलदार निंबाळकर यांच्याकडे देण्यात आले आहेत. निवेदन देतेवेळी यावेळी रि.पा.इं नेते सुरेश वाघमारे यांच्यासह नितीन वाघमारे, भिमसेन वाघमारे, नामदेव वाघमारे, शंकर वाघमारे, रमेश वाघमारे, किरण वाघमारे, संभाजी वाघमारे, जी.सी. वाघमारे, संदीप वाघमारे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

हातोंड बौध्दवाडीतील वृध्द महिलेला झालेल्या मारहाणीसह निकृष्ट दर्जाच्या धान्य वाटपाची तक्रार हातोंड ग्रामस्तांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबरोबरच धान्याचे नमुने देखील देण्यात आले आहेत. यावर पुरवठा विभागामार्फत लवकरात लवकर चौकशी केली जाईल. त्याचबरोबर उपलब्ध अहवालानुसार कारवाई केली जाईल. असे तहसिलदार बी. एन. निंबाळकर यांनी सांगितले आहे.

Web Title: in sudhagad shopeeoers are behave advance