उन्हाच्या कडाक्‍याने पौषातच लाही लाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

पारा ३६ अंशांवर - आंब्यावर ‘थ्रिप्स’ची शक्‍यता

रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर उष्णतेचे प्रमाण गेल्या तीन दिवसांत वाढले आहे. पारा ३६ अंशांवर पोचल्याने पौषातच वैशाखाचा ताप होतो आहे.

कमाल व किमान तापमानामध्ये काही ठिकाणी १६ ते २० अंशांचा फरक पडला. त्यामुळे आंब्यावर थ्रिप्सचा ॲटॅक होऊ शकतो. असे वातावरण अधिक काळ राहिल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.

पारा ३६ अंशांवर - आंब्यावर ‘थ्रिप्स’ची शक्‍यता

रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर उष्णतेचे प्रमाण गेल्या तीन दिवसांत वाढले आहे. पारा ३६ अंशांवर पोचल्याने पौषातच वैशाखाचा ताप होतो आहे.

कमाल व किमान तापमानामध्ये काही ठिकाणी १६ ते २० अंशांचा फरक पडला. त्यामुळे आंब्यावर थ्रिप्सचा ॲटॅक होऊ शकतो. असे वातावरण अधिक काळ राहिल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.

गेले काही दिवस उत्तरेकडून येत असलेल्या वाऱ्याचा प्रभावही कमी झाला. रविवारपासूनच (ता. २२) कोकणातील वातावरणात तापमान वाढू लागले. समुद्रकिनारी भागाला त्याचा मोठा परिणाम जाणवतो आहे. रात्री किमान तापमान १९ अंश सेल्सिअस, तर दिवसा ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पारा चढला आहे. दापोलीत किमान तापमान ५ अंश सेल्सिअसने वाढून १४ वर पोचले, तर कमाल तापमान ३४ वर पोचले आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात जोरदार थंडी होती. गेल्या चार दिवसांत थंडी कमी झालीच, शिवाय घामही यायला लागला आणि पारा चढत चालला. ४ ते ५ अंश सेल्सिअसने तापमान वाढले. त्याचा परिणाम कोकणातील आंब्यावर होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

जानेवारीत कैरी येते. या वर्षी थंडीचे प्रमाण सर्वाधिक काळ टिकून होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात बंपर मोहोर आला होता. थंडीचा जोर कायम राहिल्याने ‘रि फ्लॉवरिंग’ची बागायतदारांनी व्यक्‍त केलेली भीती खरी ठरली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसात आंब्यावर दुसऱ्यांदा मोहोर आला. काही प्रमाणात कैरीची गळ झाली. 

गेल्या पाच दिवसांतील वाढते तापमान
तारीख          किमान     कमाल

१९ जानेवारी   १९.४      ३३.४
२० जानेवारी   १८.२      ३३.४
२१ जानेवारी   १७.३      ३४.२
२२ जानेवारी   २०.६      ३५.७
२३ जानेवारी   १९.१      ३६.७
२४ जानेवारी   २०.६      ३६.४

थंडीचा कालावधी वाढल्याने रिफ्लॉवरिंग होऊ लागले. त्यात पहिला मोहोर गळून गेला. आता वातावरणातील उष्मा वाढल्याने थ्रिप्सचा प्रादुर्भाव होईल. बदललेल्या वातावरणामुळे भविष्यातील आंबा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
- प्रसन्न पेठे, आंबा बागायतदार

...स्थिती १५ दिवस आधी
रविवारपासून सलग तीन दिवस कडाक्‍याचे ऊन आणि थंडी अशा वातावरणामुळे आंब्यावर ‘थ्रिप्स’ रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फुलकिडा मोहोरावरून फिरला तर फळधारणा होत नाही. कैरीवरून फिरला तर आंबा चिकूसारखा होतो. फेब्रुवारीत थ्रिप्सचा प्रादुर्भाव असतो. या वर्षी ती स्थिती पंधरा दिवस आधी आल्याचे बागायतदारांचे निरीक्षण आहे.

Web Title: summer increase