उन्हाने काहिली; विद्यार्थ्यांनाही झळा

संदेश सप्रे - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

देवरूख - संगमेश्‍वर तालुक्‍यात सध्या सूर्य आग ओकत आहे. गेल्या २० वर्षांत नसेल एवढ्या प्रमाणात पारा यावर्षी कमालीचा वर गेला आहे. तालुक्‍याचे तापमान गेले दोन दिवस ३८ वर गेले असून उष्णतेच्या वणव्यात सुरू झालेल्या परीक्षा आणि दोन दिवसांवर येऊन ठेपलेला शिमगोत्सव यामुळे तालुकावासीयांना ‘झळा या लागल्या जीवा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

किनारपट्टीपासून ४० कि.मी. अंतरावर वसलेल्या संगमेश्‍वर तालुक्‍यालाही या लाटेचा तडाखा बसला आहे. तालुक्‍यात आजवर मे महिन्यातही पारा ३८ ते ३९ वर थांबत होता. गेले दोन दिवस मात्र तालुक्‍याचे तापमान ४० वर गेले आहे. वैशाखातील वणव्यापेक्षाही यावेळच्या माघ-फाल्गुन महिन्यातील या उष्णतेच्या वणव्याने पशू-पक्ष्यांबरोबरच माणसाचेही हाल होत आहेत. मध्यरात्री १२ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बोचरी थंडी आणि सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कडाक्‍याचे ऊन या बदलेल्या वातवरणाचा फटका आरोग्यावरही होत आहे. सर्वत्र सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यातही उष्माघाताने होणारे आजारही बळावल्याने ठिकठिकाणच्या दवाखान्यांमध्ये गर्दी दिसत आहे. 

अजूनही कोकणात शिमगोत्सव सुरू झालेला नाही तो दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे, तर भाजावळी बाकीच आहेत. कोकणात शिमगा आणि भाजावळीनंतरच तापमानात वाढ होते. यावर्षी मात्र हे सारेच संकेत चुकले आहेत. वृक्षतोडीत होणारी बेसुमार वाढ यामुळे वाढलेले तापमान आणि कोरड्या पडत चाललेल्या नद्या याने तालुक्‍यात यावर्षीही टंचाईचे सावट गडद झाले आहे. तालुक्‍यात या महिन्यातच टॅंकर धावण्याची लक्षणे आहेत. उन्हाने झालेल्या काहीलीतच परीक्षा सुरू झाल्या. त्याचा फटकाही विद्यार्थ्यांना बसला. अजूनही दहावीच्या परीक्षा सुरू झालेल्या नाहीत. यामुळे उष्णतेच्या लाटेत या वेळी विद्यार्थ्यांना परीक्षेआधीच केंद्रावर जाईपर्यंत घाम गाळावा लागणार आहे.

Web Title: Summer sluggishness