१० गुंठ्यांत लागवड - १० डबे तेल मिळण्याची अपेक्षा

संदेश सप्रे
गुरुवार, 6 एप्रिल 2017

देवरूख - संगमेश्‍वर तालुक्‍यात गहू, बटाटे, कांदे, ऊस, स्ट्रॉबेरी पिकांच्या यशस्वी उत्पादनापाठोपाठ धामणीतील प्रगतशील शेतकरी भालचंद्र गणेश सप्रे आणि उदय जनार्दन पाध्ये यांनी प्रायोगिक तत्त्वावर १० गुंठे जमिनीत सूर्यफुलाचा मळा पिकवला आहे. 

देवरूख - संगमेश्‍वर तालुक्‍यात गहू, बटाटे, कांदे, ऊस, स्ट्रॉबेरी पिकांच्या यशस्वी उत्पादनापाठोपाठ धामणीतील प्रगतशील शेतकरी भालचंद्र गणेश सप्रे आणि उदय जनार्दन पाध्ये यांनी प्रायोगिक तत्त्वावर १० गुंठे जमिनीत सूर्यफुलाचा मळा पिकवला आहे. 

भालचंद्र सप्रे यांचा संगमेश्‍वरात हॉटेल व्यवसाय असला, तरी त्यांना शेतीची आवड आहे. गेली १५ वर्षे ते कुळीथ, पावटा, भात, नाचणी, हंगामी भाजीपाला अशी पिके घेतात. त्यांच्या शेजारीच राहणारे उदय जर्नादन पाध्ये यांनाही शेतीत रस आहे. या दोघांनी मिळून या जमिनीत काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. यातून सूर्यफुलाची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्याचे ठरले. यासाठी उदय पाध्ये यांनी आपली १० गुंठे जमीन प्रयोगासाठी दिली. यानुसार कोल्हापुरातून बियाणे आणले. दोघांकडेही कृषी विभागाकडून घेतलेले साडेपाच अश्‍वशक्‍तीचे पॉवर टिलर आहेत. त्यांच्या साह्याने १० गुंठे जमिनीत ५ दिवसांच्या फरकाने ४ वेळा नांगरणी केली. गावात पाटाचे मुबलक पाणी, शिवाय दोघांकडेही कृषी पंप आहेत. १० गुंठ्यांत ६ इंचाच्या फरकाने दीड किलो बियाणे पेरण्यात आले. नियमित पाणी व्यवस्थापन आणि कोणतेही रासायनिक खत न वापरता केवळ सेंद्रिय खतांचा वापर करून या दोघांनीही फेब्रुवारीत लागवड केली. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात येथे सूर्यफुलाचा हिरवा-पिवळा मळा फुलला आहे. केवळ दोन महिन्याच्या कालावधीत येथे साडेसहा फूट उंचीची सूर्यफुले डोलताना  दिसत आहेत. 

अजूनही फुलांच्या काढणीला वेळ असला तरी सध्याचे पीक पाहता यातून किमान १० डबे तेल निघेल असा विश्‍वास भालचंद्र आणि उदय व्यक्‍त करतात. शेतीकामात दोघांनीही व्यवसाय सांभाळून वेळ दिला. त्यांना आतापर्यंत केवळ चार हजार खर्च आला आहे. यातून ९ ते १० डबे तेल निघाल्यास पुढील वर्षी हा प्रयोग एकरात करण्याचा मानस दोघांनीही व्यक्‍त केला. 

शेतीत कष्ट करून जिद्द ठेवल्यास शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळते. आम्ही हे गेले १५ वर्षे अनुभवत आहोत. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांनी शेतीकडे वळावे. 
- भालचंद्र सप्रे, शेतकरी

Web Title: sunflower agriculture