लोकसभेसाठी रायगडमधून सुनील तटकरेंची उमेदवारी निश्‍चित 

मुझफ्फर खान
सोमवार, 2 जुलै 2018

पुढील महिन्यात होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे महासचिव सुनील तटकरे यांच्याएैवजी परभणीचे नेते बाबाजानी दुर्राणी यांना उमेदवारी निश्‍चित झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघातून तटकरे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे.

चिपळूण - पुढील महिन्यात होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे महासचिव सुनील तटकरे यांच्याएैवजी परभणीचे नेते बाबाजानी दुर्राणी यांना उमेदवारी निश्‍चित झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघातून तटकरे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी पुढच्या महिन्यात मतदान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक उमेदवार सहज निवडणूऩ येणार आहे. पक्षाचे महासचिव सुनील तटकरे विधान परिषदेचे आमदार आहेत. पुढील महिन्यात त्यांचा कालावधी संपणार आहे. राष्ट्रवादीला विधान परिषदेत तटकरेंसारख्या अभ्यासू नेत्याची गरज आहे. तसेच रायगड लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे अनंत गीते यांचा पराभव करण्यासाठी तटकरे यांच्याशिवाय राष्ट्रवादीकडे अन्य पर्याय नाही. मागील निवडणुकीत तटकरेंचा काठावर पराभव झाला होता. काही दिवसापूर्वी त्यांची राष्ट्रवादीच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय राजकारणात तटकरेंचा प्रवेश झाल्यानंतर रायगड लोकसभा मतदार संघातून पुन्हा तटकरे यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे संकेत कार्यकर्त्यांना प्राप्त झाले होते. मात्र तटकरेंना राज्याच्या राजकारणात रस असल्यामुळे ते मुलगी आदितीला लोकसभेच्या मैदानात उतरवतील आणि स्वतः विधान परिषदेवर जातील अशी चर्चा होती. परंतू पक्षाने परभणीचे ज्येष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी यांना विधान परिषदेची उमेदावारी जाहीर केली आहे.

परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे ते आमदार होते. यावेळी ही जागा काँग्रेसला घेऊन राष्ट्रवादीने उस्मानाबाद-बीड-लातूरची जागा लढवली होती.  दुर्राणी यांना तिकीट नाकारण्यात आल्यामुळे ते नाराज होते. पक्षाने त्यांची नाराजी दूर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तटकरे लाकेसभेची निवडणूक लढवतील हे आता निश्‍चित झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil Tatkare is candidate of NCP in raigad