निष्क्रिय खासदारांसोबत विकासाची लढाई - तटकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

"मी कोकणच्या विकासाला प्राधान्य दिले. आमदार म्हणून रायगडच्या कानाकोपऱ्यात जाऊन विकास केला. राज्याचा ५० वा अर्थसंकल्प मांडताना कोकणसाठी निधी दिला. पर्यटन विकासासाठी निधी दिला. याउलट गेल्या पाच वर्षात उद्योगमंत्र्यांना एकही उद्योग मतदारसंघात आणता आला नाही."

गुहागर - रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना विकासासाठी निधी कसा आणायचा हेच माहिती नाही. २० वर्षांत गीतेंनी मतदारसंघातील समस्यांकडे पाठ फिरवली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील लढाई निष्क्रिय खासदारांबरोबर आम्ही केलेल्या विकासकामांची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार सुनील तटकरे यांनी केले. 

सुरतमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या सभेत ते बोलत होते. सुरतमध्ये (गुजरात) रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील अनेक मंडळी नोकरी, उद्योगासाठी गेली आहेत. या सर्वांच्या एकत्रिकरणसाठी मेळावा आणि हळदी-कुंकू समारंभ रविवारी (ता. ३) पद्मनाभ संप्रदाय अमृतनाथ सत्संग मंडळाच्या दत्तमंदिर येथे झाला. तटकरेंनी भाषणाची सुरवात गुजरातीमधून केली.

ते म्हणाले, ‘‘मी कोकणच्या विकासाला प्राधान्य दिले. आमदार म्हणून रायगडच्या कानाकोपऱ्यात जाऊन विकास केला. राज्याचा ५० वा अर्थसंकल्प मांडताना कोकणसाठी निधी दिला. पर्यटन विकासासाठी निधी दिला. याउलट गेल्या पाच वर्षात उद्योगमंत्र्यांना एकही उद्योग मतदारसंघात आणता आला नाही. २० वर्ष मतदारांनी निवडून दिले. या कालावधीत त्यांनी केलेला विकास दाखवून द्यावा. जनतेने संधी दिल्यास खासदार काय असतो, हे प्रभावीपणे दाखवून देईन. विकासाचे ‘वाण’ रायगड लोकसभा मतदारसंघाला मला द्यायचे आहे.’’ 

या वेळी वरदा तटकरे, राष्ट्रवादीचे निजामपूर विभागाचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर, सुरेश महाबळे, सुरेश पवार, पापेकर मॅडम, अनंत महाडिक, सुभाष शेलार, जितू पवार, संदीप पार्टे आदी उपस्थित होते.

कुणबी समाजाला साद
रायगड मतदारसंघात कुणबी मतदार बहुसंख्येने आहेत. त्यांच्या पाठिंब्यावर ६ वेळा अनंत गीते निवडून आले. हे लक्षात घेऊन सुनील तटकरे यांनी मी जातीने गवळी असलो, तरी कर्माने कुणबी आहे, असे सांगत कुणबी समाजाला साद घातली.

Web Title: Sunil Tatkare comment