भास्कर जाधवांसाठी तटकरे घेणार माघार

भास्कर जाधवांसाठी तटकरे घेणार माघार

चिपळूण - रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुनील तटकरे यांचे नाव चर्चेत होते. मात्र आमदार भास्कर जाधव यांनीही लोकसभेसाठी तिकिटाची मागणी केल्यामुळे रायगडच्या उमेदवारीसाठी तटकरे-जाधव यांच्यामध्ये स्पर्धा आहे. उमेदवारीचा निर्णय पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत होईल. मात्र तटकरे यांनी माघारीची तयारी दर्शविली आहे. 

राष्ट्रवादीने लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेऊन उमेदवारांची चाचपणीला सुरवात केली आहे. मुंबईतील राष्ट्रवादी भवनात आज १८ लोकसभा मतदारसंघाची बैठक घेण्यात आली. ईशान्य मुंबईनंतर रायगड मतदारसंघाची बैठक झाली.

रत्नागिरी जिल्ह्यातून आमदार संजय कदम, सरचिटणीस शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्यासह दापोली व गुहागर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते बैठकीला गेले होते. आमदार भास्कर जाधव यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते या बैठकीला हजर राहिले नाहीत. मात्र पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे, असे आमदार कदम व जिल्हाध्यक्ष जाधव यांनी बैठकीत सांगितले. गतवेळी तटकरे यांचा काठावर पराभव झाला होता. विधान परिषदेचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी आपल्या जागी मुलाला विधान परिषदेत पाठविले. त्यामुळे तटकरेंची लोकसभेची उमेदवारी निश्‍चित मानली जात होती. 

दोघांची मते घेणार
सुनील तटकरे व भास्कर जाधव दोघेही माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान कोअर कमिटीचे सदस्य आहेत. दोघांची मते घेतल्यानंतरच पक्षाला रायगडचा उमेदवार ठरवावा लागणार आहे. 

पक्षाने संधी दिल्यास मी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार आहे. बैठकीला उपस्थित राहणे शक्‍य नसल्याने माझी मागणी आमदार संजय कदम व जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे कळवली होती. 
- भास्कर जाधव,
आमदार 

भास्कर जाधव निवडणूक लढवण्यासाठी तयार असतील, तर मी माघार घेऊन जाधवांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन. 
- सुनील तटकरे,
राष्ट्रीय सचिव- राष्ट्रवादी काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com