लोकप्रियतेवर स्वार होण्यासाठी यात्रा

रत्नागिरी - भाजप शासनाच्या योजनांची माहिती देणाऱ्या सुराज्य रथामध्ये माहिती घेताना नागरिक व भाजपचे पदाधिकारी.
रत्नागिरी - भाजप शासनाच्या योजनांची माहिती देणाऱ्या सुराज्य रथामध्ये माहिती घेताना नागरिक व भाजपचे पदाधिकारी.

रत्नागिरी - शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोचत नाहीत आणि त्यामुळे योजनांचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला मिळत नाहीत.

याकरिता राज्यातील भाजप सरकारने एलसीडी स्क्रिनसह एसी सुराज्य रथ साकारला. एकाच वेळी सुमारे ११ जणांना योजनांची माहिती पाहण्याची व ऐकण्याची संधी या रथामध्ये मिळते. मिस्ड कॉल दिल्यानंतर शासनाच्या योजना संबंधिताला सांगितल्या जातात. राज्यातील सर्व जिल्ह्यांत हा रथ फिरत आहे. आज रत्नागिरीत रथ दाखल झाला.

रत्नागिरीत या रथाचा हजारभर लोकांनी लाभ घेतला. रथयात्रा असली तरी या पौराणिक कल्पनेला पूर्णपणे आधुनिक साज देण्यात आला आहे. त्यामुळे हा रथ हायटेक आहे. रथाच्या मागील बाजूला एलइडी स्क्रिन आहे. त्यावर सरकारी योजनांची माहिती दाखवण्यात येते.

महाराष्ट्रात भाजप सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यनिमित्त सर्वत्र सुराज्यपर्व कार्यक्रम राबवण्यात येत आहे. रथामध्ये भाजप सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचा आढावा, सरकारने महाराष्ट्रातील जनतेसाठी ज्या योजना राबविल्या त्यांची माहिती देण्यात येते. प्रत्येक योजनेचा पाच मिनिटांचा डेमो आहे. ऑडिओ-व्हिज्युअलद्वारे योजना व तिची अंमलबजावणी अनुभवता येते. रथामध्ये प्रवेश केल्यानंतर लोकमान्य टिळकांवरील ‘स्वराज्य’ या मराठी चित्रपटातील काही अंश दाखवला आहे. स्वराज्य ही संकल्पना तेव्हापासून सुरू झाली. आज सुराज्य येत आहे, असे लोकांच्या मनावर ठसवले जाते.

सुराज्यरथाचे उद्‌घाटन जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी केले. या वेळी सचिन वहाळकर, प्रशांत डिंगणकर, उमेश कुळकर्णी, अविनाश साटम, मुन्ना चवंडे, बिपीन शिवलकर, ॲड. प्रिया लोवलेकर, चेतना जावकर आदी उपस्थित होते. रथ चांदेराई बाजारपेठ, पावस एसटी स्टॅन्ड, कुवारबाव येथे फिरवण्यात आला. उद्या (ता. २४) जाकादेवी बाजारपेठ, गणपतीपुळे, कोतवडे बाजारपेठ येथे जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com