ड्रोनद्वारे भूमापनाच्या हालचाली 

Surveillance movements by drone
Surveillance movements by drone

ओरोस (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गात गावठाण जमिन वादातून मोजणीसाठी बरीच मागणी असते; मात्र इथल्या दुर्गम भौगोलिक स्थितीमुळे यात अडचणी येतात. यासाठी ड्रोनद्वारे भूमापनाची योजना येथे प्रभावी ठरू शकते; पण राज्याच्या या योजनेत सिंधुदुर्ग सोडाच कोकणातील एकाही जिल्ह्यात या योजनेत समावेश असतानाही अद्याप मोजणी सुरू झालेली नाही; मात्र जिल्ह्यात गावठाणांसाठी ही योजना प्रस्तावित आहे. 

ड्रोनद्वारे गावठाण क्षेत्रातील भूमापन करण्याची योजना राज्याच्या ग्रामविकास विभाग, महसूल विभाग व भारतीय सर्व्हेक्षण विभागाने आणली आहे. याचा प्रारंभ कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यात सुरू झाला आहे. घाटमाथ्यावरील अनेक जिल्ह्यात ही योजना राज्याने लागू केली असताना कोकणातील एकाही जिल्ह्यात यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. तळकोकणात असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही अत्याधुनिक व पारदर्शी भूमापन पद्धत सुरू झाली पाहिजे, अशी मागणी जिल्ह्यातून होवू लागली आहे. 

ड्रोनद्वारे गावठाण जमिनीची मोजणी झाल्यानंतर गावांतील मालमत्ताचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्तेचे अचूक मालकीपत्रक तयार होणार आहे. अचूक मालमत्ता पत्रक तयार झाल्याने त्याचा लाभ गावकरी व ग्रामपंचायत यांच्यासाठी लाभदायी ठरणार आहे. शेतकऱ्यांना ज्या प्रमाणे त्यांच्या जमिनीचा सातबारा उतारा उपलब्ध होतो. त्याप्रमाणे जिल्ह्यातील गावठाण जमिनीचे ड्रोनद्वारे भूमापन झाल्यावर मालकी हक्काचे सीमांकन करण्यात येते. परिणामी प्रत्येक नागरिकास त्यांच्या हक्काच्या मालमत्तेचे मालकीपत्रक उपलब्ध होणार आहे. अचूक मालकी पत्रकामुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे व्यवहार करण्यास अडचण येणार नाही. खरेदी-विक्री, बॅंक कर्ज, मिळकत हस्तांतरण या बाबी सुलभतेने होणार आहेत. 
पारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा ड्रोनद्वारे भुमोजणी कमी वेळेत, कमी श्रमात आणि कमी मनुष्य बळाचा वापर करून करता येते. ही पद्धत आधुनिक आहे.

त्यामध्ये पारदर्शकता व अचूकता आहे. यामुळे प्रत्येक घराचा, खुल्या जागेचा, रस्त्याचा नकाशा तयार होणार आहे. एकंदर ही मोजणी जिल्ह्यासाठी फलदायी आहे. जिल्ह्यात यांची खरी गरज आहे. कारण येथे जमिनीचे वाद मोठ्या प्रमाणात आहेत. असंख्य वाद न्यायालयात प्रलंबित आहेत. कित्येक वाद शासनाच्या भूमि अभिलेखकडून शासकीय मोजणी होत नसल्याने वाढत आहेत. जिल्ह्यातील शासकीय भुमोजणी करणाऱ्या भूमि अभिलेख विभागाकडे पुरेसा मनुष्यबळ नाही. त्यामुळे हजारो संख्यने मोजणी प्रलंबित आहेत. यामुळेच आधुनिक ड्रोनद्वारे होणारी जमीन मोजणी जिल्ह्यात लवकर होणे गरजेचे आहे. 

शासनाने सुरू केलेल्या गावठाण ड्रोन मोजणीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. त्यादृष्टीने जिल्ह्याचे नियोजन केले आहे. ड्रोन सूची तयार आहे. गावठाण हद्द निश्‍चिती केली आहे. गावठाण ही जमीन शासकीय असते. तेथे मालकी वहीवाट करणाऱ्या नागरिकांची असते. आतापर्यंतपर्यंत या जमिनीचा सर्व्हे झाला नाही. प्रथमच हा सर्व्हे होणार आहे. यामुळे नागरिकांना हद्द समजेल, मालकीपत्रही मिळेल. 
- डॉ. विजय वीर, अधीक्षक, जिल्हा भूमी अभिलेख विभाग. 

जिल्ह्यात 32 गावठाणे 
घाट माथ्यावरील जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावठाण असलेली गावे कमी आहेत. वेंगुर्ले आणि वैभववाडी या दोन तालुक्‍यात एकही गावठाण नाही. जिल्ह्यात केवळ 32 गावात गावठाण क्षेत्र आहे. 

ड्रोन मोजणीचे फायदे 
- प्रत्येकाला मालकी हक्काबाबत मिळकत पत्रिका व सनद 
- 7/12 प्रमाणेच मालकी हक्क पुरावा म्हणून कायदेशीर मान्यता 
- बॅंक कर्ज उपलब्धता सोपी 
- बांधकाम परवानगीसाठी आवश्‍यक मिळकत पत्रिका 
- सीमांकन माहिती असल्याने मालमत्तेचे रक्षण सोपे 
- जमिन विषयक वाद मिटविण्यास उपयोग  

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com