औरंगाबाद अन् पुण्यातील चार पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचवले

राजेश कळंबटे
शनिवार, 29 डिसेंबर 2018

पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गणपतीपुळे येथे बुडणार्‍या चार पर्यटकांना मोरया असोसिएशनच्या जीवरक्षकांनी वाचविले आहे. मंदिरासमोरील एक नंबरच्या टॉवरपुढे दोन वेगवेगळ्या वेळी या घटना घडल्या. यातील दोन पर्यटक औरंगाबाद तर दोन पुण्यातील आहेत.

रत्नागिरी- पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गणपतीपुळे येथे बुडणार्‍या चार पर्यटकांना मोरया असोसिएशनच्या जीवरक्षकांनी वाचविले आहे. मंदिरासमोरील एक नंबरच्या टॉवरपुढे दोन वेगवेगळ्या वेळी या घटना घडल्या. यातील दोन पर्यटक औरंगाबाद तर दोन पुण्यातील आहेत.

नववर्ष स्वागत आणि नाताळ सुट्टीमुळे पर्यटक गोव्यासह कोकणातील किनार्‍यांकडे वळू लागले आहेत. 25 डिसेंबरला अंगारकीनंतर पर्यटकांचा ओघ कमी झाला असला तरीही प्रतिदिन हजारो पर्यटक भेट देत आहेत. शनिवारी (ता. 29) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास किनार्‍यावरील टॉवर क्र. 1 समोर औरंगाबाद येथील दोन पर्यटक पवन श्रीकृष्ण वाहबकार (21, पिसादेवी, सिडको, औरंगाबाद) आणि मयुर गोपाळ गिरे (18) हे दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते.

वार्‍यामुळे पाण्याला करंट आहे. लाटांचा वेगही वाढलेला आहे. किनार्‍यावर पोहताना ते दोघेही हळूहळू आतमध्ये ओढले जाऊ लागले. त्यांनी वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. मोरया वॉटर स्पोर्टस्च्या जीवरक्षकांनी विलंब न करता समुद्रात उड्या मारल्या. त्या दोघांनाही पाण्यातून बाहेर काढण्यात आले. हा प्रकार घडल्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील दोन पर्यटकांना मोरयाच्या जीवरक्षकांनी वाचवले.

विकास सिध्देश्‍वर वाघमारे (25, धानोरी, पुणे), सि्ध्दासम पिरप्पा भगळे (34, धानोरी, पुणे) हे सकाळी दर्शन घेऊन किनार्‍यावर फिरत होते. दुपारी ते समुद्रात पोहायला उतरले होते. टॉवर क्र. 1 च्या समोरच ते दोघे पाण्यात बुडत होते. जीवरक्षकांनी त्यांना समुद्रातून सुखरुप बाहेर काढले. मोरयाच्या स्पोटर्स्च्या जीवरक्षकांमध्ये रोहीत चव्हाण, अनिकेत मयेकर, उमेश म्हादये, विक्रम राजवाडकर, विशाल निंबरे, मिलिंद माने यांचा समावेश आहे.

Web Title: Survivors saved four tourists from Aurangabad and Pune