रामदास कदमांसह अन्य गद्दारांमुळे पराभव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मार्च 2019

रामदास कदमांनी उत्तर द्यावे!
आज दापोलीत होणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमांना निमंत्रण दिले जात नाही, बॅनरवरील नाव व छायाचित्र कोणी काढले, याचे उत्तर रामदास कदमांनी द्यावे. ज्यांनी मला पाडले, त्यांनाच रामदास कदम यांनी खुर्च्या (पदे) दिली असून, त्यांच्याच नेतृत्वात मी काम करायचे का, असा सवालही दळवी यांनी या वेळी केला.

दाभोळ - २०१४ च्या निवडणुकीत रामदास कदम व अन्य गद्दांरांमुळेच पराभूत झालो. त्यावेळी विजयी झालो असतो तर माझे मंत्रिपद नक्‍की होते. त्यानंतर मातोश्रीवर उद्धवजींना भेटलो. रामदास कदम यांना विधानपरिषद सदस्यत्व व मंत्रिपद दिले जात असेल तर तो न्याय मला का नाही, असे विचारत मंत्रिपदाची मागणी केली होती. त्यात गैर काय, असे प्रतिपादन सूर्यकांत दळवी यांनी येथे केले.

नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात रामदास कदम यांनी दळवी यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना दळवी म्हणाले,  ‘‘आता रामदास कदम जे सांगत आहेत ते मीठमसाला लावून सांगत असून माझ्यावर टीका करणे हाच त्यांचा एकमेव उद्योग सुरू आहे. रामदास कदम यांना दोन वेळा मंत्रिपद व एकदा विरोधी पक्षनेतेपद पक्षाने दिले. मी सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलो असल्याने एकवेळा पक्षाकडे मंत्रिपद मागितले तर बिघडले कुठे?’’

ते म्हणाले, ‘‘मी शिवसेनेशी एकनिष्ठ असून सलग पाच वेळा आमदार झालो. माझे नाव घेणार नाही, असे सांगणारे रामदास कदम दर मेळाव्यात माझ्यावर टीका का करतात? माझी या मतदारसंघात ताकद नाही, असे एकीकडे भासविताना गेल्या दोन महिन्यात माझ्या भेटीला त्यांच्याकडील दहा शिष्टमंडळे आली आहेत. या सर्वांना आपण माझे काय चुकले, हाच सवाल विचारत मी अजूनही शिवसेनेत आहे; मात्र रामदास शिवसेनेत कदापीही सामील होणार नाही. मी माझ्या घरात न्याय मागतो आहे व तोही रामदास कदमांकडे नव्हे तर पक्षप्रमुखांकडे मागतो आहे. माझ्या घरात येऊन मला संघटना व शिस्त शिकविण्यापेक्षा रामदास कदमांनी कांदिवली किंवा गुहागरमध्ये जावे व तेथून मुलाला निवडून आणावे.’’

रामदास कदमांनी उत्तर द्यावे!
आज दापोलीत होणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमांना निमंत्रण दिले जात नाही, बॅनरवरील नाव व छायाचित्र कोणी काढले, याचे उत्तर रामदास कदमांनी द्यावे. ज्यांनी मला पाडले, त्यांनाच रामदास कदम यांनी खुर्च्या (पदे) दिली असून, त्यांच्याच नेतृत्वात मी काम करायचे का, असा सवालही दळवी यांनी या वेळी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suryakant Dalvi comment