सोडून गेलेल्यांना काँग्रेस पक्षाची दारे बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पक्षाचा त्याग करून गेलेली मंडळी पुन्हा पक्षात येणार असतील तर तालुका काँग्रेसच्या शिफारशीशिवाय त्यांना पक्षात प्रवेश देण्यात येऊ नये अशा मागणीचा ठराव येथील तालुका काँग्रेसच्या बैठकीत केल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुशील राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

देवगड - काँग्रेस पक्षाच्या जीवावर विविध पदे उपभोगलेली मंडळी पक्ष अडचणीत असताना पक्षाला सोडून गेली. आज पक्ष वाढीसाठी कितीही गरजेचे असेल तरी पक्षाचा त्याग करून गेलेली मंडळी पुन्हा पक्षात येणार असतील तर तालुका काँग्रेसच्या शिफारशीशिवाय त्यांना पक्षात प्रवेश देण्यात येऊ नये अशा मागणीचा ठराव येथील तालुका काँग्रेसच्या बैठकीत केल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुशील राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

राष्ट्रवादीशी आघाडी झाली तरीही लोकसभा आणि येथील विधानसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याची असल्याने ती सोडण्यात येऊ नये अशाही कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

पक्ष संपणार नाही
काँग्रेस पक्ष संपणार नाही. लवकरच पक्षाची युवक, महिला तसेच एन.एस.यु.आय. रचना करण्यात येईल. तसेच जानेवारीत जिल्ह्यात होणाऱ्या पक्षाच्या संघर्ष यात्रेसाठी सुमारे ५०० कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.

येथील पक्ष कार्यालयात तालुका काँग्रेसची बैठक झाल्यानंतर राणे पत्रकारांशी बोलत होते. तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, माजी तालुकाध्यक्ष नंदकिशोर कांदळगांवकर, माजी तालुकाध्यक्ष अरूण टेंबुलकर, सुगंधा साटम, अंकुश नाईक, महिला तालुकाध्यक्षा तन्वी महाडिक आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, ‘‘अलिकडेच झालेल्या काही राज्यांच्या निवडणूकांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले. पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून वर्षभराच्या आतच पक्षाला यश मिळवून दिले. जुनी सत्ता केंद्रे काँग्रेसने उलथवली.

जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी सर्वांचे प्रयत्न आहेत. राजकीय प्रवासात यशापयश असतेच; मात्र पक्षात राहून विविध पदे उपभोगलेली मंडळी पक्ष अडचणीत असताना पक्षाला सोडून गेली. अशा मंडळीना तालुका काँग्रेसच्या शिफारशीशिवाय पक्षात घेऊ नये असा ठराव झाला आहे. मागण्यांचे ठराव जिल्हा तसेच प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवणार आहोत.’’

Web Title: Sushil Rane Press conference